विसर्जन घाट, कृत्रिम हौद, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन आणि आपत्कालीन नियंत्रणासाठी महापालिकेची व्यापक तयारी
पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने शहरभर व्यापक तयारी केली आहे. विसर्जन घाटांची दुरुस्ती, रंगरंगोटी, कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही, जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, सुलभ शौचालये, अतिरिक्त प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाचे २२ अधिकारी, १५ फायरमन आणि एकूण १२० जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. विविध घाटांवर लाईफ जॅकेट, रिंग आणि दोरखंड उपलब्ध करून देण्यात आले असून, विसर्जनाच्या काळात सुरक्षेसाठी २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिका नियंत्रण कक्षासाठी ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००, अग्निशमन दलासाठी १०१, पोलीस मदतीसाठी १०० / ११२, तर रुग्णवाहिकेसाठी १०८ या क्रमांकांवर संपर्क करता येणार आहे.
विसर्जन घाट आणि कृत्रिम हौदांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेनुसार सुमारे २७७ ठिकाणी ४,१३० फ्लड लाईट्स, तर ९४ ठिकाणी ३९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था असून विद्युत विभागाची पथकेही तैनात राहणार आहेत.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांनी नदीपात्राऐवजी कृत्रिम हौद आणि महापालिकेच्या पर्यायी व्यवस्थांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवात शहरात एकूण ६ लाख ५४ हजार ४१० मूर्तींचे विसर्जन किंवा संकलन करण्यात आले होते, तर सुमारे ९ लाख २३ हजार किलो निर्माल्य जमा झाले होते.
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा हे पाचही मानाचे गणपती येतात. या परिसरात पाच विसर्जन ठिकाणे, विविध ठिकाणी लोखंडी टाक्या, पुरेशी पाणी व प्रकाश व्यवस्था, तसेच महिलांसाठी बेलबाग चौक आणि अलका टॉकीज चौक येथे हिरकणी कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे २२ ठिकाणी १५० मोबाईल टॉयलेट्स बसविण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
महापालिकेने नागरिकांना विसर्जन घाटांवरील विद्युत यंत्रणा, फ्लड लाईट्स किंवा विद्युत खांबांशी छेडछाड न करण्याचे आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

