अनधिकृत वीजजोडणी टाळा; विद्युत खांब, फिडर पिलरपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने गणेश मंडळे आणि नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सवासाठी करण्यात येणारी विद्युत रोषणाई व इतर विद्युत कामे अधिकृत आणि पात्र विद्युत ठेकेदाराकडूनच करून घ्यावीत, तसेच कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत वीजजोडणी घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मंडप, देखावे आणि रोषणाईसाठी मोठ्या प्रमाणावर विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी मंडळांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून आवश्यक ती अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने नागरिक व गणेश मंडळांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विद्युत खांब अथवा विद्युत यंत्रणेला कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, फिडर पिलरला स्पर्श करू नये, पथदिव्यांच्या खांबावर विद्युत रोषणाई किंवा इतर साहित्य लावू नये, जनावरे विद्युत खांबांना बांधू नयेत आणि जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच विद्युत तारांजवळ मंडप किंवा अन्य साहित्य उभारताना सुरक्षित अंतर ठेवावे. जमिनीत खोदकाम करतानाही भूमिगत विद्युत केबलला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास होणाऱ्या दुर्घटना अथवा जीवितहानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील, असेही विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.

