पुण्यातील उद्योगांसाठी 12 महिन्यांचा युरोपियन मार्केट अॅक्सेस कार्यक्रम प्रस्तावित; सिटी-टू-सिटी आणि ट्विन-सिटी भागीदारीबाबतही सकारात्मक चर्चा
पुणे, : पुणे महानगरपालिका आणि जर्मनीतील फ्रँकफर्ट राईन-माईन प्रदेशातील शहरांदरम्यान शहरी विकास, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्टार्टअप परिसंस्था आणि MSME विकास या क्षेत्रांत दीर्घकालीन सहकार्य निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जर्मनीतील रौनहाईम, रुस्सेल्सहाईम आणि केल्स्टरबाख या शहरांच्या प्रतिनिधींसह जर्मन-इंडियन बिझनेस अलायन्स (GIBA) च्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेला भेट दिली.

या बैठकीत पुणे आणि जर्मनीतील शहरांमध्ये City-to-City तसेच Twin-City भागीदारी विकसित करण्याबरोबरच पुण्यातील MSME आणि स्टार्टअप उद्योगांना जर्मनीसह युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
जर्मन शिष्टमंडळात रौनहाईम शहराचे महापौर डेव्हिड रेंडेल, राईन-माईन इनोव्हेशन हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन विटेकिंड, जर्मन-इंडियन बिझनेस अलायन्सचे अध्यक्ष सेल्वाकुमार पेरियासामी, GIBA चे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल रामन कन्नैयन आणि Expandeers चे भारतातील भागीदार चारुदत्त पांडे यांचा समावेश होता.
पुणे महानगरपालिकेकडून महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, महापालिका सचिव योगिता भोसले आणि अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे बैठकीला उपस्थित होते.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी जर्मन शिष्टमंडळाचे स्वागत करत पुणे आणि जर्मनीदरम्यान दीर्घकालीन आणि परिणामकारक भागीदारी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान, शहरी विकास, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्य विकसित करण्यास पुणे महानगरपालिका उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्याच्या वेगाने होत असलेल्या शहरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अनुभव आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, शहरी प्रशासन, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि शहर नियोजन या क्षेत्रांमध्ये जर्मन शहरांसोबत मोठ्या प्रमाणात सहकार्याच्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी ट्विन-सिटी भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची बांधिलकी अधोरेखित केली.
रौनहाईमचे महापौर डेव्हिड रेंडेल यांनी पुणे आणि फ्रँकफर्ट राईन-माईन प्रदेशामध्ये नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासाठी मोठी क्षमता असल्याचे सांगितले. कंपन्या, संस्था आणि नागरिकांमधील संबंध दृढ करण्याबरोबरच विश्वास, आर्थिक सहकार्य आणि नवोपक्रमाच्या आधारावर दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पुण्यातील MSME साठी 12 महिन्यांचा विशेष कार्यक्रम
बैठकीत जर्मन शिष्टमंडळाने पुण्यातील निवडक MSME उद्योगांसाठी 12 महिन्यांचा युरोपियन मार्केट अॅक्सेस कार्यक्रम प्रस्तावित केला. या माध्यमातून जर्मनीमध्ये व्यवसाय विस्तार, युरोपियन बाजारपेठेत प्रवेश, बाजारपेठेचे मूल्यमापन, संभाव्य ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांशी संपर्क तसेच आवश्यक व्यावसायिक नेटवर्किंगसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे.
कचरा व्यवस्थापन आणि Circular Economy क्षेत्रातही जर्मन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत चर्चा झाली. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर, Waste-to-Energy, बायोगॅस, शाश्वत कचरा प्रक्रिया आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांचा यात समावेश आहे.
दोन्ही बाजूंनी सहकार्यासाठी MSME विकास व युरोपियन बाजारपेठेत प्रवेश, कचरा व्यवस्थापन व परिपत्र अर्थव्यवस्था, शहरी नियोजन व पायाभूत सुविधा तसेच शहरी वाहतूक व परिवहन व्यवस्था ही चार प्रमुख क्षेत्रे निश्चित केली आहेत. पुढील टप्प्यात संयुक्त कार्यक्रमांची रूपरेषा, संस्थात्मक यंत्रणा आणि समन्वयासाठी नोडल अधिकारी अथवा पथके निश्चित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
या सहकार्यामुळे पुण्याला जर्मनीतील शहरी विकासाच्या सर्वोत्तम पद्धतींचा लाभ मिळण्याबरोबरच पुण्यातील MSME, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी युरोपियन बाजारपेठेची दारे उघडण्याची संधी निर्माण होऊ शकते.

