“गणेशोत्सवाच्या परंपरेचा काँग्रेसला अभिमान; मात्र ध्वनी प्रदूषणाने संस्कृती नासवू नका”
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनी प्रदूषणावरून पुण्यात सुरू असलेल्या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध दर्शवतानाच या मुद्द्यावर भूमिका मांडणारे विद्याधर बापट यांच्याबाबत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
पुण्याने देशाला आणि जगाला गणेशोत्सवाचे वैभव दिले असून समाजाला एकत्र आणणाऱ्या या उत्सवाचा काँग्रेसला अभिमान असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. मात्र, परंपरेच्या नावाखाली राजकीय आशीर्वादाने सुरू झालेला डीजेचा दणदणाट पुण्याच्या गणेशोत्सवाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्सव हा सर्वांना आनंद देणारा असला पाहिजे. वृद्ध, नवजात बालके, विशेष गरजा असलेली मुले तसेच मुक्या प्राण्यांना असह्य आवाजाचा त्रास देऊन आपणच आपली संस्कृती नासवत आहोत का, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.
“नागरिकांनी कुत्र्यांकडून प्रमाणपत्र आणावे का?”
डीजेच्या दणदणाटाला विद्याधर बापट हे तार्किक आणि सभ्य भाषेत विरोध करत असल्याचे सांगत जगताप यांनी धीरज घाटे यांच्यावर निशाणा साधला. “त्यांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेला उत्तर देण्याऐवजी ‘त्यांना गल्लीत कुत्रा विचारत नाही’ असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे,” असे जगताप यांनी म्हटले.
“ज्या नागरिकांनी मतदान करून भाजपला सत्ता दिली, त्यांनी आपले मत मांडण्यापूर्वी आता गल्लीतल्या कुत्र्यांकडून प्रमाणपत्र आणायचे का?” असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
“गल्लीतून दिल्लीत नेणारेच पुन्हा गल्लीत आणतील”
भाजपवर टीका करताना जगताप यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. “ज्या नागरिकांनी भाजपला गल्लीतून दिल्लीपर्यंत नेले, तेच नागरिक भाजपचा माज उतरवून पुन्हा गल्लीत आणतील,” असा इशारा त्यांनी दिला.
गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक स्वरूप कायम ठेवतानाच कर्णकर्कश डीजे आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

