पुणे-
भारतीय टपाल विभाग यांच्या वतीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या अनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 च्या निमित्ताने जारी करण्यात आलेल्या विशेष आवरणाचे प्रकाशन आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये होते. तर, पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल प्रिती अग्रवाल, पुणे क्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी टेबल टेनिस खेळाडू पूजा कोपरकर, आश्लेषा बोडस, शिव छत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू मनोज एरंडे आदी खेळाडू उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिन हा हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. क्रीडा, आरोग्य, फिटनेस आणि युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे.

क्रीडा क्षेत्रातील योगदान, क्रीडाप्रेम आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने हे विशेष आवरण प्रकाशित केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर या विशेष अनावरणामुळे देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.
भारतीय टपाल विभागाचे विशेष अनावरण हे महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, क्रीडा आणि सांस्कृतिक विषयांचे स्मरण जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहेत. त्यामुळे या विशेष आवरणाला क्रीडाप्रेमी, टपाल तिकिट संग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमास टपाल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, टपाल तिकिट संग्राहक तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट सिद्धार्थ हराळे यांनी केले, तर आभार पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधीक्षक नितीन येवला यांनी मानले.

