नव्याने समाविष्ट ३४ गावांसह शहरातील भटक्या जनावरांसाठी उपचार, लसीकरण, चारा बँक आणि पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह शहरातील मोकाट आणि भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँक, लसीकरण तसेच पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्य सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
संबंधित विभागाकडून प्रस्तावाबाबत सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या मुख्य सर्वसाधारण सभेत त्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्याबरोबरच जनावरांचे संरक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जखमी आणि असहाय जनावरांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने २४ तास तातडीची पशुवैद्यकीय रुग्णवाहिका आणि आवश्यक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही टिंगरे यांनी केली आहे.
“मृत गोमातेला उचलण्यासाठी तातडीने मदत उपलब्ध होते; मात्र जखमी जनावरांच्या उपचारासाठी महानगरपालिकेची मदत वेळेत उपलब्ध होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जखमी जनावरांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा गोशाळेत नेण्यासाठी स्वतंत्र तातडीची वाहतूक यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनावरांच्या तस्करीविरोधात काम करणाऱ्या गोरक्षकांवर यापूर्वी जीवघेणे हल्ले झाल्याचा उल्लेख करत, अशा परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेण्याऐवजी प्रशासनानेच तातडीने हस्तक्षेप करता येईल अशी सक्षम आणि अधिकृत यंत्रणा निर्माण करावी, अशी भूमिकाही टिंगरे यांनी मांडली.
“प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आता हा निर्णय केवळ कागदोपत्री न राहता आधुनिक गोशाळा आणि २४ तास तातडीची पशुवैद्यकीय सेवा प्रत्यक्षात सुरू करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे सुहास टिंगरे यांनी म्हटले.

