मनमानी चालणार नाही:गणेश मंडळ कार्यकर्त्यांना इशारा, लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य नको – पोलीस आयुक्तांची तंबी

Date:

पुण्यात कर्णकर्कश साउंडवर बंदी; नियमभंग केल्यास थेट जप्तीची कारवाई

गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची कडक भूमिका; प्लाझ्मा, मिड प्रेशर आणि प्रेशर हॉर्नवर बंदी

पुणे :एकीकडे राजकीय कार्यकर्ते त्यांचे प्रेशर तर दुसरीकडे कायदा आणि लोकहिताची जबाबदारी पार पाडण्याची कसरत पुणे पोलिसांना करावी लागते असून गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साउंड सिस्टीमला मुभा दिली जाणार नसून, ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या साउंड सिस्टीमवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

विशेषतः प्लाझ्मा साउंड, मिड प्रेशर सिस्टीम तसेच प्रेशर हॉर्नसारख्या तीव्र आवाज निर्माण करणाऱ्या साधनांना परवानगी दिली जाणार नाही. उत्सव साजरा करण्यास पोलिसांचा विरोध नसला, तरी उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजाला परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्साहात आणि आनंदात साजरे व्हावेत, अशीच पोलिसांची भूमिका आहे. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाच्या साउंडला मुभा देता येणार नाही. ध्वनिक्षेपकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे आणि आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.

साउंडमध्ये ‘बेस’ आणि ‘टॉप’ किती? नियमावली होणार

ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार आहे.

याशिवाय साउंड सिस्टीममध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियम निश्चित करण्यावर चर्चा सुरू आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात साउंड वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई करून संबंधित साउंड सिस्टीम थेट जप्त केली जाऊ शकते.

साउंड, प्लाझ्मा तसेच मिड प्रेशरसारख्या कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या यंत्रणांवर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

‘उत्सव साजरा करा; पण ध्वनिप्रदूषण नको’

“उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. आवाजाची ठरलेली मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल.”

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

दोन दिवसांपूर्वी ‘DJ मुक्त गणेशोत्सवा’च्या मागणीवरून बैठकीत गदारोळ

पुणे पोलिसांचा हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण नुकत्याच पुणे महापालिकेत आयोजित गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

या बैठकीत एका नागरिकाने “यंदाचा गणेशोत्सव DJ मुक्त साजरा करण्यात यावा”, अशी भूमिका मांडली होती. मात्र, या मागणीला उपस्थित काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. “यांना सभागृहातून बाहेर काढा”, असा सूर बैठकीत उमटल्यानंतर संबंधित नागरिकाला सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.

या प्रकारामुळे गणेशोत्सवातील DJ, साउंड सिस्टीम आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.

नदीपात्रातील ढोल-ताशांच्या सरावावरूनही वातावरण तापले होते

याच बैठकीत नदीपात्रात होणाऱ्या ढोल-ताशांच्या सरावाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पर्यावरणाच्या दृष्टीने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सरावाबाबत काही नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आक्षेप नोंदवला होता.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात DJ, साउंड सिस्टीम, ढोल-ताशांचा सराव आणि ध्वनिप्रदूषण हे मुद्दे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

महापालिकेतील बैठकीत मंडळांनी मागितली होती निर्बंधांत शिथिलता

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासन, पोलिस अधिकारी आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवावरील निर्बंध शिथिल करून अधिक मोकळ्या वातावरणात उत्सव साजरा करण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत दिले होते.

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा स्पष्ट संदेश

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच पुणे पोलिसांनी साउंडबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केल्यामुळे मंडळांना आता साउंड सिस्टीम निवडताना आणि वापरताना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

विशेषतः कर्णकर्कश आवाज करणारे प्लाझ्मा, मिड प्रेशर, प्रेशर हॉर्न आणि अतितीव्र साउंडचा वापर केल्यास थेट कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात “उत्सवाला मुभा; पण कर्णकर्कश आवाजाला नाही”, अशीच पुणे पोलिसांची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साडेचार हजार कोटींच्या ठेवी असताना पुणे महापालिका घेणार १,१६७ कोटींचे कर्ज…

‘अर्बन चॅलेंज फंड’अंतर्गत पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि मलनिस्सारणाच्या प्रकल्पांना गती;...

ओव्हरहेड केबल धोरणाला ब्रेक; सर्वसाधारण सभेतून अचानक प्रस्ताव मागे

स्थायी समितीत एकमताने मंजुरी, मात्र भाजपमधील मतभेद आणि वरिष्ठांच्या...

‘DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करा’ म्हणताच नागरिकाला सभागृहाबाहेर काढले; गणेश मंडळांच्या बैठकीत गदारोळ

नागरिकाच्या मागणीला मंडळांच्या कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप; ‘यांना सभागृहातून बाहेर...

बस अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास पीएमपीएमएलकडून भरपाई

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या बसमुळे...