गोदामात झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा; दुसरीकडे दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश, वसईत बनावट पिशव्यांचा कारखाना उद्ध्वस्त
मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. अॅमेझॉनच्या भिवंडीतील गोदामावरील कारवाईनंतर आता ब्लिंक कॉमर्स (Blinkit) प्रा. लि.च्या मालाड पश्चिम येथील ‘डार्क स्टोअर’चा अन्न परवाना FDAने निलंबित केला आहे. ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
फळे-भाजीपाल्याजवळ झुरळे; अन्न थेट जमिनीवर
मालाड पश्चिमेतील रामचंद्र लेनवरील सर्वोदय भुवन येथील ब्लिंकिटच्या सुविधेची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. तपासणीत ताजी फळे आणि भाजीपाल्याच्या साठ्यात झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याने अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अनेक अन्नपदार्थ गंजलेल्या रॅक्सवर किंवा थेट जमिनीवर ठेवलेले होते.
गोदामात प्रभावी कीटक व उंदीर नियंत्रणाची व्यवस्था नसल्याचे, कचरा व्यवस्थापनात त्रुटी असल्याचे तसेच मुदतबाह्य, खराब किंवा पॅकेजिंगशी छेडछाड झालेला अन्नसाठा ताज्या मालासोबत कोल्ड रूममध्ये ठेवण्यात आल्याचे FDAच्या तपासणीत आढळले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षणात्मक साधनांचा अभाव होता. या त्रुटींनंतर संबंधित सुविधेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
अॅमेझॉनच्या भिवंडी गोदामावरही झाली होती कारवाई
यापूर्वी भिवंडी परिसरात केलेल्या कारवाईत FDAने मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थ पुन्हा बाजारात आणण्याच्या कथित प्रकाराचा तपास केला होता. त्या कारवाईत ५२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला होता आणि Amazon Retail Indiaशी संबंधित लॉजिस्टिक्स गोदामाच्या अन्न परवान्यावरही कारवाई झाली होती.
दूध भेसळीच्या तपासातून मोठे रॅकेट उघड
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दूध भेसळीच्या एका वेगळ्या प्रकरणाचा तपास करताना मोठे जाळे उघड केल्याचे समोर आले आहे. ९ जुलै रोजी दहिसर पूर्व येथे गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ने छापा टाकला होता. नामांकित कंपन्यांच्या सीलबंद दूध पिशव्या कापून त्यातील काही दूध काढणे, त्यात अस्वच्छ पाणी मिसळणे आणि पिशव्या पुन्हा सील करून विक्री केल्याचा आरोप आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, सुमारे १३ हजार बनावट रिकाम्या अमूल पिशव्या, भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्याचे पुढील तपासातून समोर आले.
तेलंगणातून मुख्य आरोपी ताब्यात; वसईतील कारखान्यावर छापा
दहिसर प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी कथित मुख्य आरोपीचा शोध घेत त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून वसई पूर्वेतील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात बनावट अमूल दूध पिशव्या तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर तेथे छापा टाकून बनावट पिशव्या आणि त्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे १० लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
या प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, कथित मुख्य आरोपी २०२१ पासून मुंबई आणि उपनगरांमध्ये दूध भेसळ करणाऱ्यांना बनावट पिशव्यांचा पुरवठा करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षेवर FDAचा वाढता फोकस
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र FDAकडून गेल्या काही आठवड्यांत हॉटेल्स, बेकऱ्या, डेअरी, क्लब आणि क्विक-कॉमर्सच्या गोदामांची तपासणी वाढवण्यात आली आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या अनेक आस्थापनांच्या परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

