नॉर्थ मेन रोडचे रुंदीकरण, हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची कामेही तातडीने पूर्ण करा; नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी
पुणे : पुणे शहरातील महत्त्वाच्या रस्ते आणि वाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज, १० ऑगस्ट रोजी विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खराडी-केशवनगर पुलाचे काम १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य अभियंता (पथ) यांना दिले. मात्र पुलाच्या अॅप्रोच रोडची उर्वरित कामे त्यानंतरही सुरू राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
आयुक्तांसमवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रभारी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
ABC फार्म चौक–ताडीगुत्ता चौक रस्ता रुंदीकरणाला गती
नॉर्थ मेन रोडवरील ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करताना, रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या विविध सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करून रस्ता रुंदीकरणाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता रुंदीकरणाची प्रक्रिया रखडू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्यावर आयुक्तांनी भर दिला.
हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्यावरील ड्रेनेज काम तातडीने पूर्ण करा
यानंतर आयुक्तांनी हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेली पावसाळी वाहिनी आणि ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
हडपसर रेल्वे स्टेशनकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कामामुळे वाहतुकीला अनावश्यक अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेत प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तज्ज्ञ सल्लागारांना देण्यात आल्या.
१५ ऑगस्टला खराडी-केशवनगर पूल खुला
पाहणी दौऱ्यात खराडी-केशवनगर पुलाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने या पुलाचे महत्त्व लक्षात घेऊन १५ ऑगस्ट रोजी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
पुलाचा वापर सुरू झाल्यानंतरही अॅप्रोच रोडची काही कामे सुरू राहतील. या काळात नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

