आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारासाठी आरक्षण कायम ठेवण्यास स्थायी समितीची मान्यता

Date:

पुणे,

मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावरील सार्वजनिक/निमसार्वजनिक (पीएसपी)आरक्षण कायम ठेवून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह, लोकोपयोगी उपक्रम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्ताराला मान्यता देण्याची शिफारस करणाऱ्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

या विषयाला यापूर्वी शहर सुधारणा समितीने मान्यता दिली होती. नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी यासंदर्भात शहर सुधारणा समितीकडे पत्र सादर करून संबंधित भूखंडावरील आरक्षण कायम ठेवण्याची तसेच आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली होती.

प्रस्तावानुसार, संबंधित भूखंडावरील पीएसपी झोन कोणत्याही कायद्याअंतर्गत बदलू नये आणि तो कायम ठेवावा, अशी भूमिका नोंदविण्यात आली आहे. तसेच या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह, इतर लोकोपयोगी उपक्रम आणि भव्य स्मारकाचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

याशिवाय, या कामासाठी राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षात २५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे. विकास आराखड्यात संबंधित जागेचा झोन बदलण्यासाठी आवश्यक वैधानिक प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण करून महापालिकेच्या अभिप्रायास मान्यता द्यावी, अशी शिफारस स्थायी समितीने मुख्य सभेकडे पाठविली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावरील अभिप्राय स्वीकारताना सदस्य वैशाली बनकर आणि रुपाली धावडे यांनी उपसूचना मांडली. त्यानुसार आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडे २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात यावी आणि त्या प्रस्तावावर ३० दिवसांच्या आत निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे करण्यात यावी आणि यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्य शासनाचा निधी प्राप्त झाला नाही तर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून स्मारकाचे काम सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली. या उपसूचनेला समितीने मंजुरी दिली.

पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी ११४.८९ कोटींच्या वर्गीकरणाला मंजूरी

पुण्यात २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२७’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि विद्युत विषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११४ कोटी ८९ लाख ७३ हजार रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिका कार्यक्षेत्रात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पत विभागाकडून 84 किलोमीटरचे विविध रस्ते सुधारणा आणि संबंधित कामे तसेच विद्युत विभागामार्फत आवश्यक विद्युत कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या स्पर्धेसाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने विविध विकासकामांच्या अर्थशीर्षकांमधून निधीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पथ विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध रस्ते विकास योजनांमधून निधी वर्ग करण्यात येणार आहे. यामध्ये आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, आंबेगाव पठारातील डीपी रस्ते, चिंतामणी ज्ञानपीठ ते महामार्ग मार्ग, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर परिसर, टेल्को कॉलनी, महाराणा प्रताप चौक ते राजे चौक मार्ग, साईसिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ रस्ता तसेच धनकवडी बसथांबा चौक विकास यांसारख्या विविध प्रकल्पांतील निधीचा समावेश आहे.

या प्रस्तावाला वित्तीय समितीची मान्यता मिळाल्याचे प्रशासनाने नमूद केले असून, आता स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मंजुरी घेतल्यानंतर निधीचे वर्गीकरण करून संबंधित कामांना गती दिली जाणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये ग्रँड सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार दुरुस्त करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांवर काही महिन्यांतच पुन्हा खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. गोखले चौक, पौड फाटा, वनाझ, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शनिवारवाडा, युनिव्हर्सिटी चौक, नळ स्टॉप आदी भागांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून, अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची झाकणे तुटल्याने वाहतूक सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांचे स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता लेखापरीक्षण करावे आणि डिफेक्ट लायबिलिटी पिरेडमध्ये असलेली सर्व खराब कामे संबंधित कंत्राटदारांकडून विनामूल्य दुरुस्त करून घ्यावेत असे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर २०२७ च्या स्पर्धेसाठी होणारी सर्व रस्ते कामे गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या निकषांवरच पूर्ण करावीत, असा आग्रह भिमाले यांनी बैठकीत धरला.

येरवडा हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटींच्या डांबर खरेदीचा मार्ग मोकळा, खड्डे दुरुस्ती वेगाने होणर
पुणे महापालिकेच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे कामकाज अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) आणि थर्मिक ऑइल अशा पेट्रोलियमजन्य साहित्याच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
येरवडा येथील महापालिकेचा बॅच मिक्स (हॉटमिक्स) प्लांट शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच मुख्य पथ विभागाला दररोज डांबरी मिश्रणाचा पुरवठा करतो. या मिश्रणाचा वापर पावसाळ्यातील खड्डे बुजविणे, रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी केला जातो. वर्षभर दोन शिफ्टमध्ये प्लांट कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्याचा सातत्याने पुरवठा आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

प्रशासनाने यापूर्वीही २०२३ मध्ये सुमारे १४.२९ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, २७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार अधिनियमातील विशेष तरतुदीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी करण्यास आयुक्तांना अधिकार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही पुढील दोन महिन्यांसाठी आवश्यक साहित्य थेट खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार डांबर (व्हीजी-३० ग्रेड), एलडीओ आणि थर्मिक ऑइल हे साहित्य हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून, तर इमल्शन (आरएस-१, आरएस-२) आणि रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) हिंदुस्थान कोलास प्रा. लि.कडून खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीसाठी कोणतीही अनामत रक्कम किंवा स्वतंत्र करारनामा करण्यात येणार नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, येरवडा हॉटमिक्स प्लांटमध्ये पार्कर कंपनीचा नवीन बॅच मिक्स प्लांट कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक थर्मिक ऑइलचीही प्रथमच खरेदी करण्यात येणार आहे. प्लांटमधील डांबरी मिश्रण आवश्यक तापमानात ठेवण्यासाठी आणि यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी थर्मिक ऑइल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विशेष कार्याधिकारी (पथ) या अर्थशीर्षाखाली १३.९९ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, त्यातून पुढील दोन महिन्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गेल्यावर्षीपेक्षा १.७९ टीएमसी अधिक पाणीसाठा; खडकवासला धरणसाखळी ९४.४६ टक्के भरली

चार धरणांत २७.५३ टीएमसी पाणी; खडकवासल्यातून सायंकाळी ७.३० वाजता...

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कलावर्धिनीचा ‘अनुग्रह’ भरतनाट्यम् नृत्याविष्कार!

डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्यासह ५० हून अधिक कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे...

पु. ल. देशपांडे उद्यानात वृक्षतोड व लाकूड चोरी:दोषींवर कठोर कारवाई करा

शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या : श्रीनाथ भिमाले पुणे...