भिडेवाडा येथील म. फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी
पुणे, दि. ३० जुलै २०२६ : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली.
आज सकाळी १० वाजता झालेल्या या पाहणीदरम्यान मंत्री भुजबळ यांनी स्मारकाच्या सुरू असलेल्या कामांची तसेच प्रस्तावित कामांची सविस्तर माहिती घेतली. स्मारकाचे काम अधिक गतीने, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भिडेवादा येथील ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता स्मारकाच्या वास्तूचे स्वरूप जुन्या हेरिटेज वास्तुशैलीशी सुसंगत असावे, तसेच इमारतीच्या अंतर्गत भागातील रचना आणि सजावटही ऐतिहासिक वारशाला अनुरूप असावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील उपलब्ध जागेचा नागरिकांच्या दृष्टीने योग्य व प्रभावी वापर करण्यात यावा, यावरही त्यांनी भर दिला.
भिडेवाडा येथील म फुले राष्ट्रीय स्मारकाचे संपूर्ण काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करून पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी केली.
स्मारकाच्या तळमजल्यावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे अर्धपुतळे उभारण्यात येणार असून, हॉलमध्ये त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर होलोग्राफी, ऑडिओ-व्हिज्युअल आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी शोच्या माध्यमातून फुले दाम्पत्याच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.
तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर मुली व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र, कला विकास केंद्र यांसह विविध उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याने, स्मारकाची उभारणी करताना ऐतिहासिक वारशाचे जतन, दर्जेदार बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समन्वय साधावा, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी निर्देशित केले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) .प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त तुषार बाबर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

