पुणे-वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने वार आणि पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, हर्षल वाडेकर यांना मोक्का न्यायालयाने २६ जुलैपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अमन ऊर्फ लाला फारूख बागवाले, वेदांत श्रीनिवास टेमगिरे, आवेज आश्पाक शेख, ऋषिप्रसाद मोहन आंबट, आफताब शरीफ सय्यद यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
त्यांच्यासह आंदेकर टोळीप्रमुख बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्याविरोधात सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या हल्ल्यात अक्षय ऊर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
ही घटना २० मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथील राजर्षि शाहू बँक चौकात घडली. वनराजच्या खुनाचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर,
स्वराज वाडेकर, हर्षल वाडेकर यांना बुधवारी दुपारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या घराची झडती घ्यायची असून, त्यांनी पिस्तूल कसे आणले, गुन्ह्याचा कट कोठे आणि कसा रचला, याबाबत चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली.

