पालघर – डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गोळा करून एका पोत्यात भरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गजबजलेल्या भागात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे डहाणूसह संपूर्ण परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, हा संपूर्ण थरार डहाणूच्या इराणी नगरमधील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानात घडला. दरोड्याची ही संपूर्ण घटना समोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरोडेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. दुकानात प्रवेश करताच एका दरोडेखोराने हातात बंदूक घेऊन थेट मुख्य दाराचा ताबा घेतला, जेणेकरून कोणीही आत येऊ शकणार नाही किंवा बाहेर जाऊ शकणार नाही. दारात एकाने पहारा दिला असताना, त्याच्या इतर दोन साथीदारांनी दुकानात घुसून मालकाला शस्त्राचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शोकेस आणि लॉकरमधील सोन्याचे मौल्यवान दागिने एका मोठ्या पोत्यात भरण्यास सुरुवात केली. दुकानात उपलब्ध असलेले बहुतांश दागिने पोत्यात कोंबून दरोडेखोरांनी काही मिनिटांतच दुकानाचा ताबा मिळवला.दुकानातून लाखोंच्या किमतीचे सोने पोत्यात भरल्यानंतर, दोन्ही दरोडेखोर बाहेर आले आणि दारात बंदुकीसह उभे असलेल्या आपल्या तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून अत्यंत वेगाने घटनास्थळावरून पसार झाले.
या चोरट्यांनी अत्यंत हुशारीने स्वतःचे चेहरे कापडाने पूर्णपणे बांधले होते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असले, तरी आरोपींचे चेहरे स्पष्टपणे ओळखता येत नाहीत. हा पूर्वनियोजित कट असावा आणि आरोपींनी परिसराची आधी रेकी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

