कोंढवा बुद्रुक, लोहगाव, कल्याणीनगर आणि वाघोली परिसरात महापालिकेची धडक कारवाई
पुणे, दि. १८ जुलै : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ४० हजार २२५ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्ची आणि पक्की बांधकामे जमीनदोस्त केली. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोंढवा बुद्रुक, लोहगाव, कल्याणीनगर तसेच वाघोलीतील गट क्रमांक ७३८ परिसरात ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उप आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बांधकाम विकास विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी, अभियंते तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबी, जॉ-कटर, गॅसकटर आणि ब्रेकरच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
कारवाईसाठी एक पोलीस अधिकारी, १२ पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ७० जवान तैनात करण्यात आले होते. याशिवाय नऊ जेसीबी, नऊ गॅसकटर, १४ ब्रेकर, एक जॉ-कटर आणि ५० बिगारी सेवकांचा वापर करण्यात आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सकाळपासून ही कारवाई सुरू होती.
या मोहिमेमध्ये बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर, उप अभियंते वीरेंद्र टिळेकर, सपना सहारे, विवेक डुब्बेवार आणि इरफान शेख तसेच कनिष्ठ अभियंते रामदास कडू, अभिषेक कुसाळकर, सुशील मोहिते, पूजा नन्नवरे आणि सौरभ खरात सहभागी झाले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची हेही उपस्थित होते.
अनधिकृत प्लॉट खरेदी करू नका
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा मंजूर होईपर्यंत नागरिकांनी बेकायदेशीर प्लॉटिंगमधील जागा खरेदी करू नये. अशा जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यास महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उप आयुक्त सोमनाथ बनकर यांनी दिला आहे.

