एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचा निर्णय; 32 एकरांवर उभारणार समाजसेवा आणि उद्योजकतेला समर्पित विद्यापीठ
मुंबई | प्रतिनिधी
एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा आणि त्यांचे बंधू लक्ष्मी नारायण गोयल, जवाहर गोयल व अशोक गोयल यांनी आपले वडील स्वर्गीय नंद किशोर गोयंका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हरियाणातील अग्रोहा (हिसार) येथे ‘श्री नंद किशोर गोयनका युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सुमारे 32 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या विद्यापीठासाठी जवळपास 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
अग्रोहा येथे स्वर्गीय नंद किशोर गोयनका यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजारो नागरिक, हितचिंतक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत डॉ. सुभाष चंद्रा यांनी ही घोषणा केली. समाजसेवा, शिक्षण आणि उद्योजकता या मूल्यांवर आधारित हे विद्यापीठ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
विद्यापीठात समाजसेवा, नेतृत्व विकास आणि ‘समाजऋण फेडणे’ या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी गोयनका कुटुंबाने एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (EDII), अहमदाबाद यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.
पंतप्रधान मोदींचे शोकपत्र
स्वर्गीय नंद किशोर गोयनका यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोयनका कुटुंबाला शोकपत्र पाठवत त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविले. त्यांनी गोयनका यांच्या सामाजिक बांधिलकी, साधेपणा आणि राष्ट्रहिताच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचे निधन समाजासाठी मोठी हानी असल्याचे म्हटले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
अंत्यसंस्काराला केंद्रीय मंत्री मनोहर लाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, हरियाणातील मंत्री रणबीर गंगवा, राज्यसभा सदस्य सुभाष बराला, तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, योगगुरू बाबा रामदेव, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि बीएसईचे एमडी व सीईओ सुंदररमन राममूर्ती यांनीही शोक व्यक्त केला.
‘शांती बैठक’ आणि ‘रस्म पगडी’ कार्यक्रम
गोयनका कुटुंबाने हिसार येथील गोयंका सेवा सदन, देवी भवन मंदिर परिसरात दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत ‘शांती बैठक’ आयोजित केली आहे. तसेच 26 जुलै 2026 रोजी महाराजा अग्रसेन भवन, हिसार येथे ‘रस्म पगडी’ कार्यक्रम होणार आहे.
सेवा आणि शिक्षणाचा वारसा
स्वर्गीय नंद किशोर गोयंका यांचे 13 जुलै 2026 रोजी मुंबई येथे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. समाजसेवा, परोपकार आणि जनकल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठीच गोयनका कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात हा मोठा उपक्रम हाती घेतला असल्याचे डॉ. सुभाष चंद्रा यांनी स्पष्ट केले.

