सॅलेसबरी पार्क परिसरात अस्वच्छता व ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रत्येकी ₹२५ हजारांचा दंड
पुणे, दि. १५ : पुणे महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने सेंसेबरी पार्क परिसरातील दोन प्रसिद्ध बेकऱ्यांवर अस्वच्छता पसरविणे आणि अनधिकृतपणे ड्रेनेज लाईन व नाल्यात सांडपाणी सोडल्याप्रकरणी मोठी दंडात्मक कारवाई केली. दोन्ही बेकऱ्यांवर प्रत्येकी ₹२५ हजार, असा एकूण ₹५० हजारांचा दंड आकारण्यात आला असून, ही रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली.
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मंगळवारी (१५ जुलै) प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मध्ये संयुक्त धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या सॅलेसबरी पार्क पार्क परिसरातील ‘गोल्डन बेकरी’ आणि ‘इंडियन बेकरी’ या दोन व्यावसायिक आस्थापनांमध्ये तपासणी करण्यात आली.
तपासणीत दोन्ही बेकऱ्यांकडून अस्वच्छता केली जात असल्याचे तसेच अनधिकृतपणे सांडपाणी थेट ड्रेनेज लाईन आणि नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिकेच्या पथकाने दोन्ही आस्थापनांवर प्रत्येकी ₹२५ हजारांचा दंड ठोठावून एकूण ₹५० हजारांची वसुली केली.
ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संतोष वाघळे, परिमंडळ क्र. ५ चे उपआयुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोपकर, आरोग्य निरीक्षक अमोळ लांडगे, तोसिफ देशपांडे आणि चंद्रदत्त गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ही कारवाई केली.
महापालिकेने इशारा दिला असून, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच सर्व नागरिक आणि व्यावसायिकांनी परिसराची स्वच्छता राखून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

