वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण स्वागत!
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने सासवड रस्त्यावरील वडकी नाला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. ‘पीएमआरडीए’ने वारीतील दिंडीप्रमुखांचा विशेष सत्कार केला. तसेच, वारकरी भाविकांसाठी पिण्याचे पाणी व फराळाचे वाटप करून सेवाकार्य केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रमुख पालखी मार्गांवर विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.
सासवड रस्त्यावरील वडकी नाला येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर ‘पीएमआरडीए’च्या वतीने दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके आणि उपअभियंता नंदकुमार खोत यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. यामध्ये कनिष्ठ अभियंता संकेत सानप, ललित शिंदे, कार्तिक पाटील, पुरुषोत्तम शामल, किरण कोष्टी आणि अनिल जाधव यांनी सक्रिय सहभाग घेत वारकऱ्यांना सेवा पुरवली. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन पथक (पीडीआरएफ) या ठिकाणी तैनात होते.

