शवविच्छेदन केंद्रांमध्ये शीतगृहे, मनुष्यबळ आणि गोपनीयतेवर भर देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
मुंबई.दि.८: राज्यातील शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) गृहांमधील रिक्त पदे, अपुऱ्या पायाभूत सुविधा, शीतगृहांची कमतरता तसेच मृतदेहांच्या गोपनीयतेच्या संरक्षणाचा मुद्दा विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान विधानपरिषद सदस्य श्रीमती. चित्रा वाघ, श्री. प्रसाद लाड, ॲड. श्री. निरंजन डावखरे यांच्यासह इतर सदस्यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आला. या चर्चेत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण भागातील शवविच्छेदन केंद्रांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधत आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक त्या सर्व सुधारणा टप्प्याटप्प्याने राबविण्याची ग्वाही दिली.
चर्चेदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अनेक ग्रामीण शवविच्छेदन गृहांमध्ये जागेचा तीव्र अभाव असल्यामुळे एकापेक्षा अधिक मृतदेह आल्यास गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त जागा, एफएसआयची तरतूद, आधुनिक शीतगृहे आणि सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली. याशिवाय शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान मृत व्यक्तीच्या मानवी प्रतिष्ठेचे आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी स्पष्ट व कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी ठामपणे मांडले.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ५३३ शवविच्छेदन गृहांपैकी अनेक ठिकाणी मृतदेह अत्यल्प प्रमाणात येतात; मात्र अपघातप्रवण आणि मोठ्या रुग्णभाराच्या ठिकाणी शीतगृहांसह आवश्यक सुविधा उभारण्यास शासन प्राधान्य देणार आहे. शवविच्छेदनातील वैद्यकीय निरीक्षणे, मृतदेहाची स्थिती किंवा अहवालातील माहिती ही अत्यंत गोपनीय असून ती केवळ नियमानुसार पोलिस तपास यंत्रणांनाच देण्यात येते. या माहितीची सार्वजनिक वाच्यता करणे नियमबाह्य असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील गृह व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील शवविच्छेदन केंद्रांमध्ये मंजूर ९३ पदांपैकी ५५ पदे कार्यरत आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. वर्ग-४ संवर्गातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन सेवा अधिक सक्षम केली जात असून, सेंट जॉर्जेससह इतर रुग्णालयांतील अत्याधुनिक शवविच्छेदन केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शवविच्छेदन गृहांतील मृत देहांच्या शारिरीक तपशीलांबाबत गोपनीयता आणि मानवी प्रतिष्ठा या कडे चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले होते त्यांची गांभीर्याने दखल देवेंद्र फडणवीस घेतल्याचे स्पष्ट झाले.

