खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या वस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
पुणे | प्रतिनिधी
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी मध्यरात्रीनंतर नदीकाठच्या भागांचा दौरा केला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, नदीकाठावर थांबू नये तसेच वाहने, जनावरे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या.
महापौर नागपुरे यांनी नदीकाठच्या वसाहतींमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले.
खडकवासला धरण बुधवारी सकाळी १०० टक्के भरले असून सांडव्यावरून २७ हजार २०३ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये प्रशासनाकडून सातत्याने गस्त आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

