आठवडाभरातील तिसरी घटना
पुणे-पुणे शहरात बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा एका मोठ्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याच्या नावाने पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या सात दिवसांतील पुण्यात बिश्नोई गँगकडून खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. या लागोपाठ येणाऱ्या धमक्यांमुळे पुण्यातील व्यापारी वर्गात प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘तुझ्या कारचा नंबर अन हालचाली ठाऊक आहेत’; कुटुंबाला संपवण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उत्तम नगर भागातील एका व्यापाऱ्याला शनिवारी सकाळी इंटरनेट कॉलद्वारे हा धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपली ओळख ‘शुभम लोणकर’ अशी करून दिली. तक्रारदार व्यापारी हे उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. आरोपीने व्यापाऱ्याला धमकावताना म्हटले की, “मला तुझा बांधकाम व्यवसाय, तुझ्या कारचा नोंदणी क्रमांक आणि तुझ्या रोजच्या हालचालींची पूर्ण माहिती आहे. तुझ्या कुटुंबातील सदस्य कुठे असतात हेही मला माहीत आहे. स्वतःची काळजी घे!” असे म्हणत जीवे मारण्याची थेट धमकी दिली आणि ‘२ कोटी रुपये तयार ठेव, पुढील सूचना लवकरच देतो’ असे सांगून फोन कट केला. घाबरलेल्या व्यापाऱ्याने तात्काळ उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
एकाच आठवड्यात तिसरा गुन्हा; पुणे पोलिस अलर्टवर
पुण्यात बिश्नोई टोळी सक्रिय झाल्याच्या संशयाने पोलिसांची झोप उडवली आहे. यापूर्वी घडलेल्या दोन घटना खालीलप्रमाणे आहेत:
२२ जून: वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. एवढेच नव्हे तर दहशत निर्माण करण्यासाठी मांतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबारही करण्यात आला होता.
२३ जून: वडकी येथील एका औषध घाऊक विक्रेत्याला फोन करून २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
एकाच आठवड्यात तीन बड्या व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, या इंटरनेट कॉल्सचा कसून तपास सुरू आहे.

