मुंबई, दि. २८ : ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.राज्यभरात कांद्याचे भाव अवघ्या 2 ते 3 रुपये किलोंवर आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज याचे तीव्र पडसाद उमटले.
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले
कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
निर्यातीला परवानगी द्यावी- छगन भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, भाव पडल्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर टाकलेत आहेत. 518 क्विंटल कांदे विकल्यावर उलट एका शेतकऱ्यालाच 318 रुपये द्यावे लागले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत गरीब वर्गातला असतो. सध्या तुर्की, मोरक्को या देशात कांद्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे तेथे भाव वाढलेले आहेत. या देशांत कांदा निर्यातील सरकारने परवानगी द्यावी. केंद्र व राज्य सरकारने मनात आणल्यास हा विषय ते सहज सोडवू शकतात. फक्त त्यांनी मनावर घ्यावे, असे आवाहन छगन भुजबळांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांकडून जोरदार धोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यामुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.