EF form म्हणजे“मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी गणना फॉर्म”
पुणे -खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत व अधिक अचूक करण्यासाठी दिनांक ३० जून २०२६ पासून EF फॉर्मचे वितरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. या प्रक्रियेस नागरिकांनी सक्रिय सहभाग देऊन आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी फॉर्म भरताना काही मूलभूत माहिती व कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत. यामध्ये अलिकडील (रिसेंट) पासपोर्ट साईज फोटो, जन्म दाखल्याची झेरॉक्स किंवा शाळा सोडल्याचा दाखला तसेच आधार कार्डाची झेरॉक्स तयार ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
मतदार नोंदणी व माहिती संकलन प्रक्रिया अधिक सुलभ व जलद व्हावी यासाठी गावपातळीवरील BLO यंत्रणेद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे. यासंदर्भात समन्वयक कार्यालयाचे अधिकारी सचिन आखाडे, किशोर पाटील आणि अंकुश गुरव यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि आपल्या कुटुंबीय तसेच परिसरातील इतर मतदारांनाही याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले.
मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी वेळेत प्रतिसाद देऊन आवश्यक कागदपत्रांसह EF फॉर्म प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

