पुणे, दि. २४ जून २०२६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या सामाजिक समतेच्या, शिक्षण प्रसाराच्या आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन (रजिस्टर्ड) यांच्या वतीने “राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६” आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, बालगंधर्व चौक शेजारी, पुणे येथे संपन्न होणार आहे.
या वर्षी फाउंडेशनच्या स्थापनेचे १२ वे वर्ष असून कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा तसेच दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे. गेल्या बारा वर्षांपासून फाउंडेशन समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करत आहे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवत आहे.
यावर्षी राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार – २०२६ विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, यामध्ये किशोर कांबळे, महाराष्ट्र विद्यार्थी संघटना, योगेश शिरोळे, अनिल गिड्डे, ह.भ.प. रामदास महाराज चऱ्हाटे, सागर खळदकर, सौ. अस्मिता रानभरे व संजय मोरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दुबल, ॲड. मिलिंद पवार, तसेच नवी मुंबई येथील उद्योजक श्री. सुभाष सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
फाउंडेशनचे मार्गदर्शक विकास पासलकर, राजेंद्र दुबल, ॲड. मिलिंद पवार, मारुतीराव सातपुते आणि अजित महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ आणि विराज तावरे यांच्यासह संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक न्याय, समानता, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच दुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास पुणेकर नागरिकांनी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

