पुणे-पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षे घरांचा ताबा न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. समीर जैन हे ‘रविनंदा लँडमार्क’ कंपनीचे संचालक असून, ते मार्केटयार्ड येथील अरिहंत हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी आहेत. ‘रविनंदा टॉवर्स असोसिएशन ऑफ पर्सन्स’चे अध्यक्ष सुखजीत सिंग निर्मल सिंग सैनी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर समीर जैन यांनी २९ जुलै २०१५ रोजी केसनंद येथील जमीन मालक आणि शेतकऱ्यांसोबत ‘संयुक्त विकास करार’ केला होता. या करारानुसार जमीन मालक आणि बिल्डर यांच्यात अनुक्रमे ४०% आणि ६०% अशी भागीदारी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून आवश्यक परवानग्या मिळवून ‘रविनंदा लँडमार्क युनिट-५’ नावाचा निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू केला.
बिल्डरने हा गृहप्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करून ग्राहकांना ताबा दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून सुमारे १५० ग्राहकांनी या प्रकल्पात फ्लॅट बुक केले आणि कोट्यवधी रुपये गुंतवले. या प्रकल्पांतर्गत ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे चार टॉवर उभारण्यात येणार होते. सुरुवातीच्या काळात बांधकाम वेगाने सुरू झाले आणि काही टॉवर्सचे सातव्या मजल्यापर्यंतचे स्लॅबही टाकण्यात आले.
मात्र, कोरोना महामारीच्या संकटामुळे हे बांधकाम पूर्णपणे ठप्प झाले. टाळेबंदी उठल्यानंतरही प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही. फ्लॅट खरेदीदार सातत्याने बिल्डरकडे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करत होते, परंतु त्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अखेर सर्व ग्राहकांनी एकत्र येत ‘रविनंदा टॉवर्स असोसिएशन ऑफ पर्सन्स’ची स्थापना केली आणि सामूहिकरीत्या लढा सुरू केला.
बिल्डरने १५० फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे ५० कोटी रुपये वसूल केले, परंतु वेळेत घराचा ताबा दिला नाही आणि प्रकल्पही अपूर्ण ठेवला. यामुळे सर्व गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांची फसवणूक झाली आहे.
वाघोली पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन खांदारे करत आहेत.

