पुणे, दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे.
दुधगंगा दुध डेअरी समोर, जुना अकलूज पुणे बायपास, इंदापूर येथे असलेल्या या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता आठवीपासून पुढील शिक्षण घेणारे तसेच कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत.प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजन, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहलीसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी : ३० जून ते ७ जुलै २०२६ तर इयत्ता ११ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी : १५ जुलै ते ३१ जुलै २०२६ पर्यंत प्रवेश घेता येईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र/प्रवेश पावती, आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृह गृहपाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

