पुणे- पुणे शहर आणि परिसरात जाणूनबुजून कचऱ्याची कृत्रिम समस्या निर्माण केली जात असून ५०० अधिक ५०० कोटी रुपयांचे टेंडर आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावे म्हणून हा घाट रचला जात आहे असा आरोप कॉंग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला आहे.
ते म्हणाले,’ ५०० कोटी च्या घनकचरा व्यवस्थापनाच्या टेंडरच्या मंजुरी साठी पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तर्फे केले जात आहे. भूमी ग्रीन या कंपनीलाच ५०० कोटी घनकचरा व्यवस्थापनाची निविदा मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण पुणे शहरातील कचरा जाणून बुजून न उचलण्याचे पाप सत्ताधारी भारतीय जनता पार्टी कडून केले जात आहे. कचऱ्याची समस्या कृत्रिमरित्या निर्माण केली जात असून यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे कृत्रिम साम्राज्य तयार केले जात आहे. पुणे शहरातील नागरिकांना वेठीस धरून कचरा व्यवस्थापन करण्याचे ठेके ठराविक कंपनीलाच मिळावे. कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे भासवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न जाणीव पूर्वक सत्ताधारी व प्रशासनामार्फत चालविला आहे. जाणूनबुजून प्रश्न गंभीर बनवत प्रशासनावर दबाव आणून लवकरात लवकर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नवीन निविदा काढण्याचा हा प्रक्रार असून जाणूनबुजून कचऱ्याचे ढीग तयार केले जात आहेत. प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास पुणे शहर भर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा आम्ही देत आहोत.

