पुणे, दि. १८ : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील चर्मकार व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांसाठी “पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गटई काम करताना ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी १०० टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल तसेच कमाल ५ हजार रुपये इतके अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध प्रवर्गातील असून त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी १ लाख रुपये व ग्रामीण भागासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने स्टॉलसाठी मागितलेली जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिकेकडून अधिकृतरित्या भाडे, करार, खरेदी अथवा मोफत ताब्यात दिलेली असावी किंवा ती स्वमालकीची असावी. संबंधित जागेचा अर्जदाराच्या नावाचा चालू ७/१२ उताराही आवश्यक राहणार आहे.
अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे – ४११००६ येथे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा.

