पुणे महापालिकेच्या देशातील पहिल्या पीपीपी तत्त्वावरील कॅन्सर रुग्णालयाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Date:

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : एकाच छताखाली सर्वसमावेशक कर्करोग (कॅन्सर) उपचार देण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने बाणेर येथे उभारलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक खाजगी तत्त्वावरील (पीपीपी) रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.१७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे,विरोधी पक्षनेते निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर, आयुक्त नवलकिशोर राम, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

श्रीनाथ भिमाले पुणे महानगरपालिकेत सभागृह नेते असताना सॅलिसबरी पार्क परिसरात हे रुग्णालय उभारावे यासाठी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. भिमाले यांनी आपल्या ‘स’ यादीतून १४.८५ कोटी रुपये इतका निधी या रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु जागेची उपलब्धता आणि व्यवहार्यता लक्षात घेता हा प्रकल्प सॅलिसबरी पार्क येथून बाणेर येथे उपलब्ध जागेवर स्थलांतरित करण्यात आला. भिमाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सहा वर्षांमध्ये तो पूर्ण झाला. या रुग्णालयातून गरीब आणि गरजू रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतून (सीजीएचएस) सवलतीच्या दरात परवडणारे उपचार दिले जाणार आहेत.

कॅन्सरचे रुग्णालय उभारणारी पहिली महापालिका आहे. पुण्यातील रुग्णांना आता मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाने वेळीच तपासणी केल्यास आजाराचे निदान लवकर होण्यास
मदत होणार आहे. शहरातील कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येचा रुग्णसंख्येचा विचार करून पुणे महापालिकेने बाणेर येथे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक कॅन्सर उपचार उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

महापालिकेचे हे पहिले स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असणार असून, शहरातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. सध्या कॅन्सर उपचारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यात खर्चिक उपचारामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

या रुग्णालयात कॅन्सर तपासणी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पीईटी-सीटीसारख्या अत्याधुनिक यंत्रणेसह डे-केअर ऑन्कोलॉजी विभागही उभारण्यात आला आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनुदानित दरात उपचार देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

बाणेर परिसर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असून, तेथे आधीच काही प्रगत रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामुळे या भागात कॅन्सर उपचारांचे केंद्र विकसित होत आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे शहरातील तसेच परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, कॅन्सर व डायलिसिस रुग्णांसाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची मर्यादा वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत पात्र रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळू शकते.

पुणे महानगरपालिका व आपुलकी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी ) अंतर्गत बाणेर, पुणे येथे अत्याधुनिक “आपुलकी मेडिकल सेंटर” सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे एक एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी मनपाकडून सुमारे रुपये १४.८५ कोटी इतका निधी (Viability Gap Funding) देण्यात आला आहे.

सदर प्रकल्पामध्ये आपुलकी हेल्थ केअरकडून रुग्णालयाचे बांधकाम, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी तसेच सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. हे केंद्र १५० बेडचे अत्याधुनिक कर्करोग व हृदयरोग उपचार केंद्र असून निदान, उपचार आणि पुनर्वसन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवा सी.जी.एच.एस. (Central Government Health Scheme) दरांनुसार उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

या मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यामध्ये लिनियर अॅक्सिलरेटर – ट्रूबीम व हायपरआर्क, डिजिटल PET स्कॅनर, जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा, ३ टेस्ला MRI, १६०-स्लाइस CT स्कॅनर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, समर्पित ICU/CCU तसेच केमोथेरपी व न्यूक्लियर मेडिसिन विभागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे PPP प्रकल्पांतर्गत अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे हे भारतातील पहिलेच केंद्र ठरणार आहे.

रुग्णांच्या सोयीसाठी खाजगी, अर्ध-खाजगी व सामान्य वॉर्डची व्यवस्था करण्यात आली असून सर्व शासकीय आरोग्य योजना तसेच खासगी विमा कंपन्यांच्या सेवा येथे उपलब्ध राहणार आहेत. पुरुषांमध्ये मुख, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस व प्रोस्टेट कर्करोग तसेच महिलांमध्ये स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर अत्याधुनिक रेडिओथेरपी व इतर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोहम्मदवाडी-उंड्री व एनआयबीएम च्या नागरिकांचा पाणी प्रश्न सुटेल- महापौर

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन पुणे-‘२४/७ पाणी पुरवठा...

मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये पोहोचणार:वेळेच्या 5 दिवस आधी

हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना ; दोनदिवसीय पाहणी दौऱ्याची...

एकल महिला शेतकऱ्यांना योजनांमध्ये प्राधान्य द्या :शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे

योजनेचा महिला शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ‘समाधान शिबीर’ आयोजित करावीत पुणे.दि.१५:...