- कबड्डीमध्ये महावितरण, महापारेषण, गुजरात, पंजाब संघाचा बाद फेरीत प्रवेश
पुणे- अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरयाणाच्या कुस्तिगिरांनी चार सूवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. तर पंजाबने दोन सूवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पद पटकावले. तसेच हिमाचल प्रदेशने एक सूवर्ण तर महावितरणच्या मल्लांनी एक रौप्य तर तीन कांस्यपदकांची कमाई केली.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बुधवारी (दि. २९) सायंकाळी उशिरा झालेल्या कुस्ती स्पर्धेतील रंगतदार झुंजीचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. यामध्ये ५७ किलो वजनगटात हरयाणाच्या प्रवीण कुमारने सूवर्ण, महानिर्मितीच्या सुनील बंडगर याने रौप्य आणि महावितरणच्या मोमीन मोहम्मद हरून याने रौप्य पदक पटकावले. कुस्तीपटूंच्या वजन गटनिहाय सूवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांची अनुक्रमे नावे पुढीलप्रमाणे– ६१ किलो – सुरेशकुमार (हरियाणा), विनोद गायकवाड (महावितरण), किसन विरनक (महापारेषण), ७० किलो- रणबीर सिंह (पंजाब), सुखवीर (हिमाचल प्रदेश), अनंत नागरगोजे (महावितरण), ७४ किलो – नरेंदर (पंजाब), बिजेंदर (हरियाणा), जोतिबा आऊलकर (महावितरण), ७९ किलो – अजय कुमार (हिमाचल प्रदेश), शेरसिंग (पंजाब), सज्जन कुमार (हरयाणा), ९७ किलो – अनिल कुमार (हरयाणा), ललित (पंजाब), दिगंबर (महापारेषण) आणि १२५ किलो वजन गटात राजकुमार (हरयाणा), अरमिंदर सिंग (पंजाब), भानुदास विसावे (महावितरण) यांनी पदकांची कमाई केली.
गुरूवारी (दि. ३०) झालेल्या कबड्डी स्पर्धेत चार गटातून आठ संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ९ वाजता पहिल्या गटात हिमाचल प्रदेश विरुद्ध बीएसईएस, दुसऱ्या गटात गुजरात जीयूयूएनएल विरुद्ध महापारेषण, तिसऱ्या गटात महावितरण विरुद्ध पंजाब आणि चौथ्या गटात भाक्रा नांगल विरुद्ध हरियाणा अशी लढत होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता चारही गटातील विजेत्या संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी लढत होईल व दुपारी ३ वाजता अंतिम सामना होईल.
आज झालेल्या कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या संघाने गुजरात जीयूयूएनएल संघाचा ६४ विरुद्ध १७ असा पराभव केला. महावितरणचे किरण देवडिगा, अमित हुमणे, प्रमोद ढेरे यांनी उत्कृष्ट चढाई व बचाव करीत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. महापारेषणने देखील उत्तराखंडच्या संघाला ५३ विरुद्ध १४ अशी मात दिली. महापारेषणकडून विनायक पाटील, पोपट वेताळ, प्रसाद यांनी उत्कृष्ट चाली रचत पंजाबला मात दिली. हिमाचल प्रदेशकडून सतनामसिंग, गुरुप्रितसिंग, मनीषकुमार नेगी यांच्या व्यूहरचनेमुळे महानिर्मिती संघाला ४८ विरुद्ध २० अशी मात खावी लागली. तर टाटा पॉवर संघाने तेलंगणा जनकोला ४३ विरुद्ध ३० अशी मात दिली. टाटा पॉवर एस. नरसिंह, अनिकेत नाईक यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला