पुणे, 30 मे 2024: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरने लक्षणीय वैद्यकीय यश मिळवले आहे. वाशीमहून आलेल्या श्री संजय चव्हाण (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरमध्ये यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. नवजीवन मिळवून देणाऱ्या या सर्जरीने वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार करून घेण्याचे आणि अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
श्री चव्हाण यांना यकृताचे गंभीर आजार होते, बिलिरुबिन पातळी आणि अस्काइट्समध्ये वाढ झालेली होती. त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ब्रेन हॅमरेज झालेल्या ४७ वर्षांच्या एक व्यक्तीने आपले यकृत दान केले. या दाता व्यक्तीला तातडीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये आणले गेले, याठिकाणी अवयव दानाची प्रक्रिया पार पाडली गेली.
या जीवनरक्षक प्रक्रियेमध्ये झेडटीसीसीच्या अवयव वाटप प्रक्रियेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दाता व्यक्ती ज्या रुग्णालयात आहे तिथेच नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णाला प्राधान्य दिले जाते. श्री संजय यांचे नाव सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यारोपणासाठी त्यांना प्राधान्य दिले गेले.
डॉक्टर बिपीन विभुते, डॉ अपूर्व देशपांडे, डॉ अनिरुद्ध भोसले, डॉ दिनेश झिरपे, डॉ राधिका, डॉ मनीष पाठक, डॉ मनोज राऊत, डॉ शीतल महाजनी आणि डॉ किरण शिंदे यांच्यासह अत्यंत कुशल डॉक्टरांच्या टीमने यशस्वी प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे आणि प्रियांका भुजबळ यांच्यासोबत, आयसीयू टीममधील डॉ. कपिल बोरावके आणि डॉ. सतीश यांनी क्रिटिकल केअर सपोर्ट प्रदान केला. देणगीदाराच्या ओळखीपासून प्रत्यारोपणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अचूकतेने पार पाडली गेली, ज्यामुळे आरोग्यसेवेतील उत्कृष्टतेसाठी रुग्णालयाची वचनबद्धता अधोरेखित झाली.
या यशस्वी प्रत्यारोपणाच्या एक महिना आधी, हडपसरमधील सह्याद्रि हॉस्पिटलने आपल्याकडील पहिले यकृत प्रत्यारोपण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. परभणीहून आलेल्या ४९ वर्षांच्या पुरुष रुग्णाला बऱ्याच काळापासून यकृताचा आजार होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना अनुरूप ठरेल असा दाता उपलब्ध झाल्याने वैद्यकीय टीमला ही क्रांतिकारी सर्जरी करता आली. अशाप्रकारे हडपसरमध्ये जीवनरक्षक उपचारांच्या उज्वल भवितव्याची सुरुवात झाली.
सह्याद्रि हॉस्पिटल्स, पुणे येथील लिव्हर व मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लान्ट विभागाचे प्रमुख डॉ बिपीन विभुते यांनी सांगितले, “वेळीच करण्यात आलेले उपचार, प्रभावी कौन्सेलिंग आणि वैद्यकीय टीमचे समन्वयपूर्वक प्रयत्न यांचे महत्त्व श्री संजय यांच्या केसमधून दर्शवले गेले आहे. गेल्याच महिन्यात आमच्या टीमने हडपसर रुग्णालयातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे केले आणि एक खूप महत्त्वाचा टप्पा पार केला. दात्याच्या कुटुंबीयांनी अतिशय परोपकारी असा निर्णय घेऊन इतर रुग्णांना नवजीवन मिळवून दिले. या प्रक्रियांमध्ये मिळालेले यश आमच्या टीमची निष्ठा आणि सह्याद्रि हॉस्पिटलमधील प्रगत वैद्यकीय क्षमता दर्शवते. असे जीवनरक्षक उपचार आम्ही यापुढे देखील पुरवत राहू ज्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा होत राहील.”