राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपाच्या महिला खासदारांकडे पाहून फ्लाइंग किस केल्याचा आरोप करत भाजपासह एनडीएतील खासदारांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. एकीकडे मणिपूर प्रश्नावरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत असताना राहुल गांधींच्या कथित फ्लाइंग किसचा उल्लेख करत भाजपा काँग्रेसवर टीका करत आहे. राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका करण्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आघाडीवर आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा हा भाजपामधल्यात लोकांचा स्थायी भाव आहे. स्मृती इराणी या तशाच आक्रस्ताळेपणाने काम करत आहेत. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस केलं म्हणत इराणी यांनी त्याचा घाणेरडा, गलिच्छ आणि विकृत अर्थ काढला. त्यामुळे आम्हाला त्यांची कीव कराविशी वाटते. ज्या पद्धतीने त्या आक्रमक होत आहेत ते पाहून वाटतं की, इतक्या दिवसांत त्या मणिपूरप्रश्नी अशा आक्रमक का झाल्या नाहीत. अशा आक्रमक होत त्यांनी मणिपूरप्रश्नी प्रश्न उपस्थित केले असते तर आज विरोधकांवर अविश्वास प्रस्ताव आणायची वेळ आली नसती. तुम्ही तब्बल ८० दिवस मूग गिळून गप्प बसलात. अविश्वास ठरावाची वेळ आली तेव्हा तुम्हाला उपरती सुचते हे सगळं चमत्कारिक आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाला त्यांच्या निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यावरून प्रश्न विचारायला हवेत. ज्या गोष्टींचा जाहिरनामा यांनी निवडणुकीआधी प्रसिद्ध केला होता, त्यावर भाजपाने लोकसभेत बोलणं अपेक्षित आहे. स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर याच स्मृती इराणी किती आक्रमक झाल्या होत्या, ते आपण पाहिलंच आहे.