महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनचा उपक्रम
पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याकरिता आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे रविवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळात जास्तीत जास्त संख्येत महिला व पुरुषांना सर्वाधिक महाराष्ट्रीयन फेटे बांधून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे आदी उपस्थित होते.
अभिलाषा बेलुरे म्हणाल्या, सर्वात जास्त फेटे एकाच ठिकाणी बांधण्याचा संकल्प महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनने केला आहे. त्यानुसार जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम होणार आहे. पुण्यासह मुंबई, सातारा, उस्मानाबाद, नगर यांसह विविध शहरांतून नागरिक सहभागी होणार आहेत.
प्रत्येकाला ११ ते १३ फूट लांबीचा फेटा घालण्यात येणार असून त्यानंतर एकत्रितपणे राष्ट्रगीताचे समूहगान होणार आहे. आतापर्यंत ६०० होऊन अधिक सहभागींची नोंदणी झाली असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नोंदणी करून फेटा बांधण्यात येणार असून त्यानंतर एकत्रिपणे समूहगान होणार असल्याने सर्व सहभागी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.
ज्यांना उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा संदेश द्यायचा असेल त्यांनी सहभागाकरिता ७७९८७९६१९९ क्रमांकावर संपर्क साधावा. दिनांक १२ व १३ ऑगस्ट रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथे राखी व फेस्टिव एक्झिबिशनचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध स्टॉल्स आहेत. तेथे देखील प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.