मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या, राहुल गांधींचा घणाघात; लोकसभेत गदारोळ
मोदींना दिली रावणाची उपमा , रावण २ लोकांचे ऐकत मेघनाथ आणि कुंभकर्ण : मोदी हे अमित शहा आणि अदानींचे ऐकतात
रावणाची लंका हनुमानाने नाही तर रावणाच्या अहंकाराने जाळली
रावणाला रामाने नाही तर त्याच्या अहंकारानेच मारले .
मणिपूरमधील दोन महिलांची आपबिती सांगितली
सुरुवातीला बोलताना राहुल गांधींनी मणिपूरमधील भेटीदरम्यान, दोन महिलांनी सांगितलेली आपबितीचे वर्णन केले. “मी मणिपूरमध्ये रिलीफ कॅम्पमध्ये महिलांशी बोललो, मुलांशी बोललो ते पंतप्रधानांनी आजवर नाही केले. मी एका महिलेला विचारले तुमच्याबरोबर काय घडले. त्यावर त्या म्हणाल्या माझा एकच मुलगा होता, माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घालण्यात आली. मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहाबरोबर लोटलेली होते, नंतर मला भिती वाटली मी घर सोडले सर्वकाही सोडले. फक्त कपडे घेऊन मी निघून आले, असे त्यांनी सांगितले. नंतर एक फोटो काढला आणि तो दाखवत म्हणाल्या फक्त हेच शिल्लक आहे. दुसऱ्या कॅम्पमध्ये एका महिलेची विचारपूस केली, तेव्हा लगेच त्यांचा थरकाप होऊ लागला त्यांना घडले त्याची आठवण झाली आणि लगेचच त्या बेशुद्ध झाल्या,” असे राहुल गांधींनी सांगितले.
ओम बिर्ला यांचे आभार मानले
राहुल गांधी यांनी सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे खासदारकी बहाल केल्याबद्दल आभारही मानले. मी गेल्यावेळी प्रामुख्याने अदानींवर बोललो होतो, त्यामुळे तुमच्या प्रमुख नेत्यांना वेदना झाल्या. त्याचा तुमच्यावरही परिणाम झाला म्हणून, मी तुमची माफी मागतो. पण आज भाजपच्या माझ्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही, कारण मी आज वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मी आज प्रामुख्याने अदानींवर बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही शांत राहू शकता, असे राहुल गांधी म्हणाले. मी आज तुमच्यावर फार टीका करणार नाही. एक दोन हल्ले नक्की करेल पण फार करणार नाही, त्यामुळे तुम्ही निवांत राहू शकता, असा टोलाही त्यांनी मारला.
देश सगळ्यांचा अहंकार संपवतो
राहुल गांधी म्हणाले मी 130 दिवस चालत भारत जोडो यात्रा केली. मला देश समजून घ्यायचा होता. मी रोज 8 किमी चालतो तर 25 किमी चालू शकतो हा अहंकार सुरुवातीला मला होता. पण भारत अहंकार संपवतो. कारण दोन तीन दिवसांत माझे गुडघे दुखू लागले. त्यामुळे अहंकार लगेच संपला. अहंकाराच्या लांडग्याची मुंगी झाली. मला भीती वाटत होती की मी चालू शकेल का? पण काहीतरी शक्ती माझ्याबरोबर होती. लोकांची शक्ती मला मिळत होती आणि मी पुढे जात राहिलो, असे राहुल गांधी म्हणाले.
मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली
राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना म्हटले की, भारतमाता आपली आई आहे, त्यामुळे आपल्याला सभागृहात बोलताना संयम बाळगायला हवा. त्यावर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, मी मणिपूरमध्ये आईच्या हत्येबाबत बोलत आहे, मी आदरानेच बोलत आहे. माझी एक आई इथे बसली आहे, तर दुसऱ्या आईची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली आहे. हिंसाचार संपत नाही तोपर्यंत तुम्ही रोज माझ्या आईची तिथे हत्या करत आहात.
लष्कराला का पाचारण करत नाही?
राहुल गांधींनी यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले. मणिपूरमध्ये भारतीय लष्कर एका दिवसात हिंसाचार संपवू शकते. पण भारत सरकारला हिंसाचार थांबवायचा नाही, म्हणून ते लष्कराचा वापर करत नाहीत, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.
रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण!
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाहीत, तर कुणाचे ऐकतात. ते फक्त दोन लोकांचे ऐकतात. रावणही दोन लोकांचे ऐकायचा मेघनाद आणि कुंभकर्ण तसेच नरेंद्र मोदी दोघांचे ऐकतात अमित शहा आणि अडाणी, असे राहुल गांधी म्हणाले.
रावण अहंकाराने मारला गेला!
राहुल गांधी पुढे म्हणाले, लंका हनुमानाने जाळली नव्हती, तर लंका रावणाच्या अहंकाराने जळाली होती. रामाने रावणाला मारले नव्हते, तर रावणाच्या अहंकारानेच त्याला मारले होते. तुम्ही संपूर्ण देश जाळण्याचा प्रयत्न करत आहात. आधी तुम्ही मणिपूरमध्ये केरोसीन टाकले आणि आग लावली आणि आता तुम्ही हरियाणा जाळण्याचा प्रयत्न करत आहात, असेही राहुल गांधी म्हणाले.