पुणे-महापालिकेचे मेडिकल कॉलेज गरीब विद्यार्थ्यांसाठी अशी हाकोटी पिटून सुरु करण्यात आले मात्र तेथील फीज आणि वरचे पैसे पाहून हे कॉलेज खरोखर गरीब विद्यार्थ्यासाठी काढले गेले कि अन्य कारणासाठी काढले गेले काय ? या प्रश्नाचे उत्तर मिळू लागले आहे.या कॉलेजच्या इमारती साठी, तेथील सुविधांसाठी,पगार पाण्यासाठी सारा खर्च महापालिका करत असून तेथील व्यवस्थापनासाठी मात्र ट्रस्ट नेमण्यात आला,तिथेच खरे तर चौकशीची गरज होती व आहे.या कॉलेजच्या व्यस्थापनासाठी ट्रस्ट नेमून, त्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार होता.या ट्रस्टच्या माध्यमातून कॉलेज चालविले जात असून,सध्या महापालिकेत प्रशासक राज असल्याने आणि ठराविक राजकीय पुढाऱ्यांचीच मर्जी चालत असल्याने विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत.असे दिसते आहे.
२०१७ मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज या नावाच्या कॉलेजलला मंजुरी दिली गेली. त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल साडेसहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलच्या जागेत या मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधण्यात येत आहे. प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोन वर्षापूर्वी शंभर विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली.
कॉलेजच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट असल्याने या कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’च्या प्रवेशासाठी दोन टप्पे आहेत. ज्यात नियमित प्रवेशासाठी ७ लाख रुपये आणि संस्थात्मक (इन्स्टिट्यूटनल) कोट्यातील प्रवेशासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे नियमित कोट्यात ८५ आणि संस्थात्मक कोट्यातून १५ जागा आहेत. सरकारी कॉलेजमध्ये एक ते दीड लाख रुपये शुल्क आहे. मात्र, हे कॉलेज ट्रस्टच्या माध्यमातून चालविले जात असल्याने दोन्ही टप्प्यांसाठी शुल्क निश्चित केले आहेत. दुसरीकडे हे कॉलेज महापालिकेच्या पैशांतून उभारले जात आहे. तेथील सेवा-सुविधांवरचा सर्व खर्च आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगारही महापालिकाच करणार आहे. त्यामुळे शुल्काव्यतिरिक्त एक नवा पैसाही जास्त घेणे अपेक्षित नाही. तरीही,अधिष्ठाताच पैसे मागत असल्याची तक्रार आहे.