पुणे-गरीब, हुषार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी (एमबीबीएस) पुणे महापालिकेने उभारलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये पात्र विद्यार्थ्यांकडूनच बेकायदेशीरपणे प्रत्येकी वीस लाख रुपयांची वसुली होत आहे. न परवडणाऱ्या नियमित शुल्काचे साडेबावीस लाख रुपये भरूनही त्यावर पुन्हा एवढी रक्कम देण्याचा तगादा कॉलेजने लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. जादा वीस लाख, तेही एकरकमी, रोखीने भरल्याशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका कॉलेजने घेतल्याने अशाप्रकारे शंभर विद्यार्थ्यांकडून वीस कोटी रुपये उकळले कि काय याचा तपास आता करावा लागणार आहे . दरम्यान या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष श्रीनाथ बनगिनवार (५४) यास एमबीबीएसच्या एका प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आता या भ्रष्टाचारात केवळ अधिष्ठाता हेच एकटे सहभागी होते कि त्यांच्याभोवती राजकीय आणि प्रशासकीय अन्य व्यक्तींचे रॅकेट होते याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
४९ वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राउंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टअंतर्गत वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे संस्थात्मक कोट्यातून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे तक्रारदार यांनी अापल्या मुलाच्या प्रवेशासाठी अधिष्ठाता बनगिनवार यांची भेट घेतली. त्या वेळी बनगिरवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहित फी २२ लाख ५० हजार रुपयांव्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रुपये लाच देण्याची मागणी केली. तडजोडीअंती पहिला हप्ता १० लाख रुपयांचा ठरला होता. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ गुन्हा दाखल झाला आहे.
अधिष्ठाताच्या कार्यालयातच पोलिसांनी लावला ट्रॅप
अधिष्ठातांनी लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी महाविद्यालयातील अधिष्ठाताच्या कार्यालयात ट्रॅप लावला. बनगिनवार याने पहिल्या हप्त्याचे १० लाख रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.