अंकल सोनवणे यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : “महापुरुषांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यांनी कार्य उभारताना जात किंवा धर्म बघितला नाही. समाजातल्या शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे, यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवू नये,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “अंकल सोनवणे यांनी समर्पित भावनेने दलित चळवळीशी एकनिष्ठ राहून काम उभारले आहे. कृतिशील विद्वत्ता आणि अनुभवाचे शहाणपण त्यांच्याकडे आहे. दलित सेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात भरीव योगदान दिले. फुले-शाहू-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवर चालणारा हा ८३ वर्षाचा कार्यकर्ता आहे.”
अंकल सोनवणे म्हणाले, “आंबेडकरी चळवळीत काम करणे म्हणजे मिरवणे नाही. समाजाच्या हितासाठी, स्वाभिमानासाठी झोकून देऊन काम करावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून काम करत गेलो. अण्णाभाऊ साठेंचे विचार मार्गदर्शक ठरले. अण्णाभाऊंच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळाला, याचा मनोमन आनंद आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांना जिवंतपणी कायम उपेक्षित ठेवले गेले. ते सर्व समाजाचे साहित्यिक होते. अण्णाभाऊ या देशाला एक अजरामर साहित्य देऊन गेले. त्या साहित्यातून आपण त्यांचे सातत्याने स्मरण केले पाहिजे.”