पुणे- शंकरराव चव्हाण जेव्हा पुण्यात येत तेव्हा प्रथम कॉंग्रेस भवनात येत जेव्हा कलमाडी यांनी पुण्याच्या कॉंग्रेस पक्षावर वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा एकदा शंकरराव चव्हाण पुण्यात आले आणि नेहमीप्रमाणे ते कॉंग्रेस भवनावर आले तेव्हा ते येतील याची चाहूल लागल्याने कलमाडी यांनी अगोदरच सर्वांना भवनाला कुलूप लावून निघून जायला सांगितले . चव्हाण आले कुलूप पाहिले अक्षरशः काही वेळ प्रतीक्षा त्यांनी केली आणि अखेरीस श्रेष्ठींना भावना कळवून निघून गेले हा इतिहास असलेल्या कॉंग्रेस भवनात आज वेगळाच किस्सा ऐकायला मिळाला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांची नुकतीच विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहरातील काँग्रेसमधील गटबाजीचा अनुभव आला. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यानिमित्ताने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले. त्यांच्या या दौऱ्यात नाराजीनाट्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यात येताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. विजय वडेट्टीवार पुणे काँग्रेस भवनात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरले.त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते थेट विजय वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले अन् थेट काँग्रेस कार्यालयात आले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासमोर धंगेकर गट आणि शहराध्यक्ष शिंदे गटातील गटबाजी समोर आली. या घटनेमुळे पुणे कॉंग्रेसमधील धूसफूस पाहायला मिळाली आहे.