पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
पुणे-गणेशोत्सव जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांसंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात ढोल ताशा पथकासारख्या पारंपरिक वाद्यांना सर्वांचीच पसंती असते. अनेक वादक यासाठी अनेक महिने सराव करत असतात. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करु, अशी ग्वाही दिली. तसेच, लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे देखील परवानगी मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे यावेळी आश्वस्त केले.
ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात लोकसहभागातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यात ढोल ताशा पथकांनाही प्राधान्य देणार असून, महासंघाने यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी कर्वेनगर डीपी रोड येथे सरावाला परवानगी मिळावी, तसेच विसर्जन मिरवणुकीवेळी रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.