मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ आरोपींपैकी ११ जणांना अटक केली असून यामध्ये टाटा रुग्णालयाचे दहा कर्मचारी आहेत. खासगी लॅबसोबत हातमिळवणी करून तीन ते चार वर्षांपासून हे कर्मचारी गरीब रुग्णांची लूट करीत असल्याचे समोर आले आहे. इतर फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॅबमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी एखाद्या रुग्णाला पाठविल्यास त्याचे बिल पाच हजार रुपयांपर्यंत झाल्यास कर्मचाऱ्यांना १० टक्के कमिशन दिले जात होते. पाच हजारपेक्षा अधिक बिल झाल्यास २० टक्के कमिशन देण्याचे ठरले होते. त्यानंतरच्या पाच हजार रुपयांच्या टप्प्यानुसार रुग्णांना पाठविण्यापूर्वी फोनवरून कमिशनबाबत ठरविले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. डॉक्टरने टाटा रुग्णालयाच्या केस पेपरवर वैद्यकीय चाचण्यांबाबत लिहून दिल्यानंतर कर्मचारी हा केसपेपर आपल्या ताब्यात घ्यायचे. एका साध्या कागदावर या चाचण्या लिहून त्या रुग्णाला इन्फिनिटी लॅबमध्ये पाठविण्यात यायचे. रुग्ण पाठवताना त्याला आपण पाठविले आहे हे कळावे यासाठी कर्मचारी लॅबमधील कर्मचाऱ्यांना फोन करून सांगत. त्यानुसार संबंधित रुग्णाच्या नावाची नोंद पाठविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर केली जायची.