पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे २ जून रोजी आयोजन
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पहिल्याच बंधुता भूषण पुरस्कारासाठी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि नामवंत दंतरोपणतज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ जून २०२३ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या पाचव्या बंधुता काव्य महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांनी दिली.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त २ जून रोजी बंधुता दिवस साजरा करण्यात येत असून, त्या निमित्ताने पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध साहित्यक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसंगी डॉ. हरिश्चंद्र गाडसिंग, सुरेशबापू साळुंके, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, शिवव्याख्याते प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी मुक्त पत्रकार व जनसंपर्क क्षेत्रातील उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच निवडक दहा कवींचा बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन होईल. नितीन वायाळ (गुजरात), मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहील. महाराष्ट्रातील नामवंत कवी यामध्ये सहभागी होतील. प्रा. संतोष काळे (पलूस) यांना बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, डॉ. सुशील सातपुते यांना बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार आणि गोपाळ कांबळे (पुणे) यांना बंधुता प्रकाशगाथा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाने महोत्सवाचा समारोप होईल. महाराष्ट्रातील निवडक दहा साहित्यिकांना बंधुता शब्दक्रांती पुरस्काराने गौरविण्यात येईल. प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. सहदेव चव्हाण, प्रा. सदाशिव कांबळे महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष पुढाकार घेऊन परिश्रम घेत आहेत.