पुणे :
कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार कार्यक्रम विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.’मनीषा नृत्यालय परिवार’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दि.२७ मे २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह(कोथरूड) येथे सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात पं.मनीषा साठे या ‘नृत्यार्पिता’ हे एकल नृत्य सादरीकरण करणार आहेत.त्यांना निखिल पाठक,राजीव तांबे,सुनील अवचट,वल्लरी आपटे साथसंगत करतील. तबला वादक निखिल पाठक आणि मधुरा आफळे या पं.मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. पं.मनीषा साठे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रमेश वैशंपायन गुरुजी संस्कृत मधून अभिष्ट चिंतन करणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे,मात्र सर्व प्रवेशिका आधीच संपल्या आहेत,असे संयोजकांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*’नृत्यार्पिता’ पं.मनीषा साठे…* —————–
मनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारताच्या विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत.
कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.मनीषा साठे यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.साठे ह्या मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.