मुंबई- कर्नाटक निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्नाटकात शक्तीशाली पक्ष आहे अशी काही स्थिती नाही. आम्ही एक प्रयत्न म्हणून काही उमेदवार उभे केले. त्यापैकी निपाणी मतदारसंघातील उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती, तिथे काही निर्णय मिळतील, अशी अपेक्षा होती. आतापर्यंतची आकडेवारी पाहता, आमचा उमेदवार पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजूनही चार फेऱ्या बाकी आहेत, अंतर सहा हजारांचे आहे. तिथे यश मिळेल याची खात्री नाही. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करण्याच्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला होता. आमचे खरे लक्ष्य हे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करणे, हेच होते. गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही त्याठिकाणचे आमदार फोडून तेथील राज्य घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरले. कर्नाटकात सुद्धा त्यांनी तीच अवस्था केली. कर्नाटकात जे सरकार होते तेही लोक फोडून घालवले. जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केले तेच कर्नाटकमध्ये झाले होते. मध्य प्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेच केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरुन सरकार पाडण्याची ही एक नवीन पद्धत सुरु झाली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिली. कर्नाटकमध्ये भाजपला ६५ ठिकाणी, तर काँग्रेसला तब्बल १३३ जागांवर यश मिळेल, असे दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळणार असे दिसत आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि लोक फोडून आपण राज्य करु शकतो, याविषयी सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास.. याविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मी कर्नाटकच्या जनतेचे व काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या चुकीचे वातावरण पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एक प्रकारचा धडा शिकवला. आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल अशा बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीतून करू शकतो. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उपयोग झाला असे म्हणता येईल. आम्ही कर्नाटकात जाऊ असे जे सीमा भागातील लोक म्हणत होते ते मुळात महाराष्ट्रातील नव्हते तर ते कर्नाटकातील होते. याची आम्ही माहिती घेतली. पण महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या सरकारची बदनामी करणे, हे त्यामागील सूत्र होते हे देखील लोकांना कळले. आम्ही एक पॉलिसी निर्णय घेतला होता की जिथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करणार नाही. तिथे आम्ही प्रचाराला गेलो नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीने आतापर्यंत मराठी लोकांना विश्वास दिला होता. परंतु महाराष्ट्र एकीकरण समिती व तेथील अन्य पक्ष यांच्यात एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात मी आमच्या पक्षाची बैठक बोलवली. मी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्ही एकत्र बसून पुढची आखणी आतापासूनच करावी, हा विचार माझ्या मनात आहे. त्याबाबत मी सर्वांशी बोलणार आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ हा विचार लोकांनी यापूर्वी अमान्य केला आहे. सर्व सूत्रं एकाच व्यक्तीच्या हातात असल्यास लोकांचा पाठींबा नाही, हे चित्र आता दिसायला लागले आहे. महाराष्ट्रात मी ज्या भागात गेलो तिथे मागच्या निवडणुकीला जसा प्रचंड प्रतिसाद मिळाला तेच चित्र मला पाहायला मिळाले. मी फार ठिकाणी गेलो नाही. पाच-सहा ठिकाणी गेलो तिथे असे चित्र पाहण्यास मिळाले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकांना इथे सुद्धा बदल हवा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल. आम्ही स्वतंत्र लढायचा प्रश्न येत नाही. आता आम्हाला असे वाटते की आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र यावे व तसेच जे छोटे पक्ष आहेत त्यांनाही विश्वासात घ्यावे. मात्र हा निकाल मी एकटा घेणार नाही तर बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.