बंगळुरू-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. काँग्रेसच्या या विजयाबद्दल पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले – या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला.
डी के शिवकुमार यांचा त्यांच्या कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा पराभव केला. विजयाची माहिती मिळताच शिवकुमार यांनी ईश्वराचे आभार मानले. तसेच मंदिरात माथा टेकून आपल्या घराच्या बाल्कनीतून समर्थकांचे अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी रडतच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण काढली.
डी के शिवकुमार म्हणाले की, ‘मी या विजयाचे श्रेय यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना व नेत्यांना देतो. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. मी राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांना काँग्रेसच्या विजयाचे आश्वासन दिले होते.’हे बोलताना शिवकुमार आपल्या तुरुंगवासाची आठवण काढत भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले व गळाही भरून आला. ते म्हणाले – ‘सोनिया गांधी मला भेटण्यासाठी तुरुंगात आल्या होत्या. मी हे विसरू शकत नाही. मी पदावर राहण्यापेक्षा तुरुंगात राहण्याची निवड केली. पक्षाचा माझ्यावर एवढा विश्वास होता.’
डी के शिवकुमार यांना राजकारणात ‘कनकपुरचा अभेद्य दगड’ म्हणूनही ओळखले जाते. काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते असणारे डी के कायम हायकमांडच्या संपर्कात असतात. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा मोठा विश्वास आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे शिवकुमार 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेत. यावेळीही त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. डी के शिवकुमार विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय आहेत.