पुणे- श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही देवर्षि श्रीनारद जयंती उत्सव दिमाखात पार पडला असून एकूण ५ दिवसीय ५ सत्रांत हा उत्सव उत्साहात पार पडला शुक्रवार दि. 5 मे 2023 ते मंगळवार दि. 9 मे 2023 पर्यंत हा उत्सव होता.संस्थेच्या श्री नारद मंदिरात ‘कीर्तन महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला.
सत्र १ मध्ये शुक्रवार दि.5 मे 2023 रोजी ह.भ.प.श्री. संदीपबुवा मांडके (पुणे) यांचे मंगलाचरणाचे कीर्तन झाले त्यांना संवादिनीची साथ वरद सोहनी यांनी केली तर तबल्यावर सिद्धार्थ कुंभोजकर याची साथ लाभली.
सत्र २ मध्ये शनिवार दि.6 मे 2023 रोजी नारद जयंतीच्या दिवशी ह.भ.प.श्री. मनोहरबुवा दीक्षित (संभाजीनगर) या ज्येष्ठ कीर्तनकारांच्या कीर्तनाने महोत्सवात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण केले.’भाव तोची देव’ आणि ‘गोपी प्रेम’ त्यांनी हे पूर्वरंग – उत्तररंग मांडले. या निमित्ताने तबल्याची साथ सिद्धिविनायक पैठणकर, आणि संवादिनीची साथ वरद सोहनी यांनी केली. झांजेची साथसंगत ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांनी केली.
सत्र ३ मध्ये रविवार दि.7 मे 2023 रोजी ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे (पुणे) यांनी ‘ज्याचा सखा हरी’ हा पूर्वरंग आणि ‘कृष्णसुदामा’ हे आख्यान सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.त्यांना तबल्याची साथ ह.भ.प निवेदिता मेहेंदळे आणि संवादिनीची साथ ह.भ.प रेशीम खेडकर यांनी केली.
सत्र ४ मध्ये सोमवार दि.8 मे 2023 रोजी ह.भ.प. शिवानी वझे (गोवा) यांनी आपल्या कीर्तनातून नाम महात्म्य सांगून उपस्थितांना जागीच खिळवून ठेवले आणि गोकर्ण आख्यानाने आणि सफाईदार आवाजाने सर्वांची मने जिंकली.झांज साथ ह.भ.प पूर्वा काणे यांनी केली.
अंतिम सत्र म्हणजे सत्र पाच मधील महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ,मंगळवार दि. 9 मे 2023 रोजी ह.भ.प कीर्तनकलानिधी व हरीकीर्तान्नोतेजक सभेचे अध्यक्ष रामचंद्रबुवा भिडे (पुणे) यांचे लळीताचे कीर्तन झाले त्यांनी यावेळी ‘ऐश्या दात्या विसरावे’ या अभंगावरील निरुपणाने भक्तिमय वातावरण निर्माण करून विष्णूमय जगताचा आभास उपस्थितांना करून दिला. त्यात भाजी वाले , चहावाले , लोककलेचे प्रतिक वासुदेव ,डॉक्टर अशी वैविध्यपूर्ण पात्रे त्यांनी व शिष्यवर्गाने सादर करून उपस्थितांना महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेतून लोककलेचे मार्मिक दर्शन घडवले.
यावेळी भिडे यांना तबल्यावर शिवराज बोधने ,संवादिनीवर साहिल पुंडलिक आणि सह गायनाची साथ ह.भ.प श्रेयसबुवा कुलकर्णी आणि ह.भ.प गौरी घाटनेकर यांनी केली.
संपूर्ण ५ दिवसीय महोत्सवात देवर्षी नारदांचे आरती गायन ह.भ.प मंदारबुवा गोखले आणि ह.भ.प सुषमा गोखले यांनी केले. या कार्यक्रमास हरीकीर्तानोत्तेजक सभेचे सर्व पदाधिकारी आणि देणगीदार , आश्रयदाते आणि कीर्तनप्रेमी रसिकांची तुडुंब गर्दी झाली.