पुणे-पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे माझे छोटे जन्मगाव. माझे वडील जनार्धन चामरे हे लोकप्रिय भजन गायक होते. त्यांची भजने ऐकून लहान वयापासून मी भजने गाऊ लागले. गावातील संगीत गुरु आर. डी. बेंद्रे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे दिले. मुंबईत उस्ताद जनाब अब्दुल रहमान खान यांचे मार्गदर्शन मला लाभले, मुंबई आकाशवाणीची कलाकार बनले आणि ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांनी मला ‘देवी तुझी सोन्याची – जेजुरी’ या चित्रपटात प्रथम पार्श्वगायनाची संधी दिली. माझ्यासारख्या छोट्या गावातील कोळी समाजातील मुलीला गायिका म्हणून घडवणाऱ्या आणि पार्श्वगायिका म्हणून संधी देणाऱ्या सर्वांची मी आयुष्यभर ऋणी आहे असे उद्गार ज्येष्ठ पार्श्व गायिका पुष्पा पागधरे (मुंबई) यांनी आज काढले. संगीताला समर्पित ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक आणि ‘कोहिनूर’ ग्रुप यांच्या तर्फे त्यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नीलिमा बोरवणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार होते. मंचावर पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयलआणि ‘स्वरप्रतिभा’चे संपादक व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे होते. ११,००० रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रारंभी युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, १९८६ मध्ये ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे पुष्पा ताईनी गायिले. युट्युबवर सुमारे पावणेदोन कोटी रसिकांनी हे गाणे ऐकले / पाहिले ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.
पुष्पा पागधरेंनी मुलाखतीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गीतकार अभिलाष व संगीतकार कुलदीप सिंग यांनी स्वरबद्ध केलेले गाणे सुषमा श्रेष्ठ समवेत ‘अंकुश’ चित्रपटासाठी मी गायिले. अभिनेते नाना पाटेकर यांचा हा पहिलाच चित्रपट! मात्र या चित्रपटाला मुंबईत चित्रपटगृह मिळेना. कारण अभिनेता, गीतकार, संगीतकार सर्वच नवे होते. अखेरीस निर्माते एम. चंद्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी ताबडतोब कोहिनूर चित्रपटगृहाला फोन करून या चित्रपटासाठी एक आठवडा मिळवून दिला. मात्र एक आठवडा नव्हे तर अनेक महिने हा चित्रपट हाउसफुल होत राहिला आणि त्यातूनच ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे लोकप्रिय होत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची मी सदैव ऋणी आहे असे त्या म्हणाल्या.
एका प्रश्नाला उत्तर देतांना पुष्पा पागधरे म्हणाल्या, सध्या आकाशवाणीवरील कार्यक्रम बंद आहेत, त्यामुळे अनेक कलाकारांना गायन, वादनाची संधी मिळत नाही त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नावर ते जगत आहेत. ज्येष्ठ कलावंतांसाठी असणारी पेन्शनही खूप कमी आहे. शासनाने अशा कलावंतांसाठी अजून काहीतरी केले पाहिजे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार म्हणाले की, ‘पूर्वीच्या काळी १९६० – १९९० दशकांमध्ये अनेक कलापथके असायची. कॉंग्रेस सेवादल, राष्ट्र सेवादल, कम्युनिस्ट पक्ष अशा कलापथकांमधून पुढे अनेक कलाकार तयार झाले, शाहिर तयार झाले. भजन मंडळीही खूप असायची. ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यातूनच पुढे आले. आज महाराष्ट्रात अनेक कलाकार प्रकाशझोतापासून दूर आहेत, उपेक्षित आहेत. अशांची महाराष्ट्र सरकारने दाखल घ्यायला हवी असा ते म्हणाले.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे प्रेरणागीत गात आम्ही मोठे झालो. त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. पुष्पा पागधरे यांना ‘पद्मश्री’ मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे ते म्हणाले.
याप्रसंगी नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच पुष्पा पागधरे यांची मुलाखत घेतली. नीलिमा बोरवणकर व त्यांच्या मॉडर्न हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनिंनी कृतज्ञता म्हणून आठ हजार रुपेयांचा चेक याप्रसंगी पुष्पा पागधरे यांना टाळयांच्या कडकडाटात दिला. श्रुती तिवारी यांनी आभार मानले.