मुंबई-पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही SIT गठीत करा अशा सूचना फडणवीसांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा 7 फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 48 वर्षीय शशिकांत वारिसे हे कोकणातील नाणार रिफायनरीविरोधात सातत्याने बातम्या लिहित होते, म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली असा आरोप केला जात आहे.
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसले” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.