पुणे- भारतीय घटना निर्मितीनंतर कालानुरूप बदल स्वीकारत आपण गेलो आहोत. घटनेत सुधारणांना वाव ठेवला आहे. घटनेमुळे देश म्हणून आपण प्रगल्भ होत गेलो आहोत. देशात लोकशाही आहे पण, नागरिकांनी लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी येथे केले.
‘लोकशाहीला वाचविणे हे घटनेच्या मूलभूत रचनेमुळेच शक्य आहे. कितीही खासदार निवडून आले तरी ही मूलभूत बांधणी, रचना टिकून राहिल ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगीतले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘भारतीय संविधानाची वैशिष्टये ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन ,कोथरूड येथे हे व्याख्यान शनिवार, ६ मे २०२३ रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान झाले. ‘ संविधान अभ्यासवर्ग ‘ या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले .
सचिन पांडुळे यांनी स्वागत केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, सिसिलीया कार्व्हालो, अरुण गद्रे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. कोल्हे म्हणाले, ‘अमेरिकेची घटना ही जगातील पहिली लिखित घटना आहे. भारतीय घटना करताना ६० घटनांचा अभ्यास ३०० जणांच्या घटना समितीने केली.भारतीय घटना तयार करीत असताना प्रत्येक शब्दावर चर्चा घडलेली आहे.भारतीय लोकप्रतिनिधी हे भारतीय राज्यघटनेला उत्तरदायी आहेत.संसदेपेक्षा घटना सर्वोच्च आहे.घटनेत दिलेले मूलभूत हक्क हे बलस्थान आहे. अधिकाराबरोबर जबाबदारी दिलेली आहे.मूलभूत अधिकारावर गदा आली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.सर्वोच्च न्यायालयाला अन्यायाची दखल स्वतःहून घेता येते,जनहित याचिका दाखल करता येते. जागतिक न्यायव्यवस्थेत ही अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे.
‘भारतात नागरी कायदा, विवाह कायदा अशा अनेक बाबतीतील कायद्यात सुधारणांना वाव आहे. मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्येदेखील नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करते.लोकशाही आहे पण, लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी शेवटी सांगितले.
‘ लोकशाही वाचवणे हे लोकांच्या हातात आहे.आणीबाणी विरोधी आंदोलनात नागरिकांनी लोकशाही वाचवून दाखवली आहे. आताही कसोटीच्या कालखंडात आपण भारतीय नागरिक म्हणून कमी पडणार नाही. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ची ‘ गांधी दर्शन शिबिरे ‘ हा त्यातील जनजागृतीचा प्रयत्न आहे. ‘ असे प्रतिपादन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.