स्वच्छ कोथरुड मतदारसंघासाठी नेहमीच कटिबद्ध
थेट भेटच्या माध्यमातून बाणेरमधील नागरिकांशी संवाद
पुणे:कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी आश्वास्त केले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार पाटील म्हणाले की, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे इथला प्रत्येक भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केल्यानंतरही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे एकूण ७८ ठिकाणे निदर्शनास आली असून, सदर भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन केल्यानंतर ही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे लोकसहभागातून ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून सदर भागातील कचरा संकलित केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बाणेर मधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसोबत सततच्या पाठपुराव्यामुळे समान पाणीपुरवठा योजने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे बाणेरमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी नागरिकांनी बाणेरमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह उभारावे, भागात ठिकठिकाणी टाकलेला राडारोडा, मुरकुटे गार्डन येथे मोठे विश्रांतीस्थान, अवैध फेरीवाले यामुळे होणारा त्रास, स्वच्छता गृहे आदी समस्या मांडल्या. सदर समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल, असे यावेळी आश्वास्त केले. तसेच यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.