मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर
मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शरद पवारांची नापसंती, पण उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया संयमी..
मुंबई-भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भूमिका कायमच ठाकरे गटाने घेतलेली आहे. मात्र नुकत्याच शरद पवारांच्या प्रसिद्ध झालेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, असे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावर ठाकरे-पवारांची परस्परविरोधी भूमिका पाहायली मिळाली आहे.मुंबई महाराष्ट्रात राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव याआधी देखील होता, अशी टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या मजकुरात हा दावा खोडून काढला आहे. लोक माझे सांगातीत शरद पवारांनी घेतलेल्या अनेक भूमिका या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी तूर्तास एवढेच बोलेल मी माझ्या या मुद्द्यावर ठाम आहे, आणि राहिल, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना उत्तर दिले.
लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शांत करण्यात शिवसेना नेतृत्व कमी पडले, असा उल्लेख करत इतर अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
बिहारचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी आज ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कपिल पाटील उपस्थित होते. ठाकरे आणि ठाकूर यांच्यात बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूत मी भाजप, शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही. नाणार प्रकल्प रद्द केला. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झालो. दिल्लीतून सूचना आल्या. चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका, असे सांगितले. मात्र, आता महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. केवळ माझे पत्र घेऊन नाचू नका. माझ्यात काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का? त्यासाठी डोक्यावर बंदूक टेकून परवानग्या घेता आणि प्रकल्प चांगले सांगता. याला काही अर्थ आहे का, असा सवाल त्यांनी केला.
बारसूतल्या जमिनी उपऱ्यांनी घेतल्या आहेत. माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावर उपऱ्यांचा वरवंटा फिरवणार का? लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कुठली लोकशाही आहे? असा सवालही त्यांनी केला. बारसूच्या जागेसाठी त्यावेळी माझ्यावर दबाव नाही, तर आग्रह होता. प्रकल्प चांगला असेल, तिथल्या लोकांनी होकार दिला, तर तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. सगळ्यांचे चांगले होत असेल, तर मी मध्ये का यावे? मात्र, सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत. सध्या प्रश्न विचारले की, मार, ठोक तुरुंगात टाक. नामशेष कर असे झाले आहे. प्रश्न विचारणे त्यांचा हक्क असल्याचे ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंगबली की जय, असे बोलून मतदान करा, असे सांगतात. मला वाटते आता निवडणूक कायद्यात बदल झाला असेल. बाळासाहेब ठाकरे असे पूर्वी म्हणाले, तर त्यांच्या मतदानाचा हक्क काढल्याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आता मी मराठी भाषकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मराठी अस्मिता जपणाऱ्या उमेदवाराला कर्नाटकात मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होऊ द्या. त्यावर मग बोलेन. मात्र, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याते ते म्हणाले. तसेच आपल्याकडूनही महाविकास आघाडीला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. मोदींचा नाही, तर प्रवृत्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना मी काय सल्ला देणार? मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू? त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले.
काय लिहिलेय पवारांनी?
शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात पान क्रमांक 417 वर लिहिले आहे, मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असे शरद पवारांनी ठामपणे लिहित या मुद्दयावरुन ठाकरेंना एकटे पाडल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. ‘लोक माझे सांगाती’, या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनेच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.