पुणे, दि. ३: नवी दिल्ली येथे २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये झालेल्या ‘टेकफोरडी’ शैक्षणिक प्रदर्शनात पुणे विद्यार्थी गृह संस्थेला मुद्रण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरवचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कुलसचिव अमोल जोशी, प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी संयोजक कमल छात्रा आणि महाराष्ट्र पॅव्हेलियनचे भुवनेश कुलकर्णी, सुजीत नाईक, रणजित मयंगबाम उपस्थित होते. पुणे विद्यार्थी गृहातर्फे डॉ. कल्याणी कुलकर्णी, प्रा. मधुरा महाजन, पुणे व नाशिक येथील प्राध्यापक अंकुश पवार, चेतन पाटील, संतोष सरोदे, सोनाली काळे, आरती पिंगळे व आठ विद्यार्थी सहभागी झाले होते.
भविष्यात अनेक विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन अभ्यासक्रम, शैक्षणिक स्तर श्रेणी पद्धती, प्रवेश परीक्षा यासारख्या असंख्य गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने प्रदर्शनामध्ये नामांकित व्यक्तींची व्याख्याने आयोजिली होती. पहिल्या दिवशी अकॅडमिक संदर्भात चर्चासत्र झाले. दुसऱ्या दिवशी भारतातील उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांचे विचार तसेच तिसऱ्या दिवशी स्टार्टअपच्या संबंधित विषयावर चर्चा झाली.
सुनील रेडेकर म्हणाले, “शिक्षणाचा मुख्य हेतू प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर होण्यासाठी असावा. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप्स स्टार्ट इन इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. ११३ वर्षांचा शैक्षणिक इतिहास असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाने प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. नवनवीन अभ्यासक्रम, स्टार्टअप, मुद्रणातील १९२६ पासून संस्थेचे कार्य आणि संशोधन यासह संस्थेच्या इतर शाखामधील शैक्षणिक सुविधांची माहिती प्रदर्शित करण्यात आली.”
लवकरच पुणे विद्यार्थी गृहामध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या मदतीने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) येथील रिसर्च फॉर फाऊंडेशनच्या सहयोगाने भारतातील पहिले डिजीटल ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वतीने व ‘एआयसीटीई’च्या सहयोगाने नवीन शिक्षण धोरणावर संस्थांसाठी चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याचे रेडेकर यांनी सांगितले.
चार सामंजस्य करारतीन दिवसांच्या प्रदर्शनात भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे, दहा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी भाग घेतला. वीसपेक्षा अधिक सहकारी प्रतिनिधी यांनी हजेरी लावली. सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इंग्लंड देशांच्या प्रतिनिधीसोबत पुणे विद्यार्थी गृह संस्थेने सामंजस्य करार केल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. तसेच भारतातील बेंगलोर, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद येथील ट्रीपल आयटी या शासकीय विद्यापीठाशीही सामंजस्य करार करण्यात आल्याचे रेडेकर म्हणाले.